शिवसेनेच्या मतामुळे संजय राठोड यांची आमदारकी नाही; समर्थकाची शिवसेना जिल्हाप्रमुखाला दमबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 10:33 IST2022-07-01T10:30:23+5:302022-07-01T10:33:11+5:30

राठोड समर्थक कार्यकर्त्याने गायकवाड यांना फोन करून आमदार राठोड यांच्याबद्दल असे कसे काय बोललात, तुमच्याकडे काय पुरावे आहेत. आमदार राठोड शिवसेनेमुळे निवडून येत नाहीत, तर ते बंजारा समाजामुळे येतात असे सांगत बघून घेऊ, असे वक्तव्य केले.

Sanjay Rathore is not an MLA due to Shiv Sena's vote; Supporters brag to Shiv Sena district chief | शिवसेनेच्या मतामुळे संजय राठोड यांची आमदारकी नाही; समर्थकाची शिवसेना जिल्हाप्रमुखाला दमबाजी

शिवसेनेच्या मतामुळे संजय राठोड यांची आमदारकी नाही; समर्थकाची शिवसेना जिल्हाप्रमुखाला दमबाजी

ठळक मुद्देऑडिओही केला व्हायरल

नागपूर : दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने केलेल्या निषेध आंदोलनात जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील ५९ मिनिटांचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा करीत आमदार संजय राठोड यांनी पक्षाशी गद्दारी करू नये, अन्यथा योग्यवेळी व्हिडिओ बाहेर काढू, असा इशारा दिला होता.

दरम्यान, मंगळवारी औरंगाबाद येथील संजय राठोड यांच्या समर्थकाने गायकवाड यांना फोन करून आ. संजय राठोड दारव्हा-दिग्रसमध्ये बंजारा समाजाच्या मतांवर निवडून येतात. त्यांना कुठल्याच पक्षाची, इतर समाजाची गरज नाही, संजय राठोड यांची सीडी तुम्ही कसे बाहेर काढता, असे सांगितले. हा ऑडिओ सोशल माध्यमात व्हायरल झाला आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आमदार संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यातच आमदार राठोड हे नुकतेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने सोमवारी यवतमाळात निषेध मोर्चामध्ये जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी संजय राठोड यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली.

राठोड वनमंत्री असताना पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भाजपने केलेल्या आरोपांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याची आठवण करून देत त्याच भाजपसोबत संजय राठोड सत्तेत जातील तेव्हा भाजप त्यांना पवित्र करून घेईलही. मात्र, आता या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करू, असे जिल्हाप्रमुख गायकवाड यांनी म्हटले होते. याच वक्तव्याच्या अनुषंगाने आमदार राठोड समर्थक कार्यकर्त्याने गायकवाड यांना फोन करून आमदार राठोड यांच्याबद्दल असे कसे काय बोललात, तुमच्याकडे काय पुरावे आहेत. आमदार राठोड शिवसेनेमुळे निवडून येत नाहीत, तर ते बंजारा समाजामुळे येतात असे सांगत बघून घेऊ, असे वक्तव्य केले. त्यानंतर या संभाषणाचा ऑडिओही व्हायरल केला.

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये असे आहे संभाषण

जय महाराष्ट्र, दीड कोटी बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांच्याबद्दल असे वक्तव्य कसे काय करू शकता, आमदार राठोड यांंना पूजा चव्हाण प्रकरणात न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे. यावर गायकवाड म्हणाले की, या प्रकरणात राठोड यांना कसलीही क्लीन चिट मिळालेली नाही. त्यावर मीही शिवसैनिक आहे, तुम्ही राठोड यांना बदनाम करू नका, राठोड शिवसेनेच्या मतामुळे निवडून येत नाहीत, असे म्हटले असता गायकवाड म्हणाले की, बंजारा समाज शिवसेनेसोबत आहेत, काही बाेलायचे असेल तर यवतमाळात या, बसून चर्चा करूया. सीडी दाखविण्याची भाषा करून संजय राठोड यांना ब्लॅकमेल करता काय, मी कुठेही यायला तयार आहे, अशा शब्दात औरंगाबाद येथील आमदार राठोड समर्थक सतीश नाईक यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांना आव्हान दिले.

Web Title: Sanjay Rathore is not an MLA due to Shiv Sena's vote; Supporters brag to Shiv Sena district chief