'Sanitizer', 'Mask' available from DPC: BJP MLAs demand | ‘डीपीसी’तून ‘सॅनिटायझर’, ‘मास्क’ उपलब्ध करुन द्या : भाजप आमदारांची मागणी

‘डीपीसी’तून ‘सॅनिटायझर’, ‘मास्क’ उपलब्ध करुन द्या : भाजप आमदारांची मागणी

ठळक मुद्देकर्जाचे हफ्ते भरण्यासाठी मुदतवाढ द्या

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे शहरातील नागरिकांना ‘लॉकडाऊन’च्या परिस्थितीत आरोग्यविषयक सामग्री उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. यामुळेच ‘डीपीसी’ किंवा आमदार निधीतून ‘सॅनिटायझर’ व ‘मास्क’ उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी शहरातील तीन भाजप आमदारांनी केली आहे. यासंदर्भात आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते व आ. विकास कुंभारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री नितीन राऊत यांना पत्र लिहिले आहे.
नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे ‘सॅनिटायझर’ व ‘मास्क’ हे ‘डीपीसी’ किंवा आमदार निधीतून उपलब्ध करून देण्यात आले तर ते जनतेपर्यंत सहजतेने पोहोचवता येतील, अशी भूमिका यात खोपडे, मते व कुंभारे यांनी मांडली आहे. ‘लॉकडाऊन’मुळे शहरात ई-रिक्षा व ऑटो चालणे बंद झाले आहे. त्यांचे दैनंदिन जगणेदेखील कठीण झाले आहे. अशा स्थितीत कर्जाचे हफ्ते भरणे त्यांना शक्य नाही. मात्र बँका व खासगी व्यक्ती कर्जाचे हफ्ते चुकवा यासाठी त्यांच्यामागे तगादा लावत आहेत. सध्याची स्थिती लक्षात घेता कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी. तसेच या कालावधीत त्यांच्याकडून व्याज किंवा दंड घेण्यात येऊ नये, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.

एप्रिलमधील लग्न समारंभ रद्द करा
देशात १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ असला तरी हा कालावधी वाढू शकतो. एप्रिल महिन्यात अनेक लग्न आहेत. ३० एप्रिलपर्यंत लग्नसमारंंभासाठी सभागृह अथवा लॉन देऊ नये असे प्रशासनाने कळविणे आवश्यक आहे. असे झाले तर सभागृहचालक तसेच लग्न असणाऱ्यांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळेल. एक महिनाअगोदर कळले तर ते घरच्या घरीदेखील लग्न समारोह आयोजित करूशकतात, अशी भूमिका तिन्ही आमदारांनी मांडली आहे.

Web Title: 'Sanitizer', 'Mask' available from DPC: BJP MLAs demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.