शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवातून संघाकडून ‘ग्लोबल रिच’चा प्रयत्न

By योगेश पांडे | Updated: September 22, 2025 20:29 IST2025-09-22T20:29:13+5:302025-09-22T20:29:48+5:30

विदेशातील मान्यवरदेखील येणार : हिंदू संमेलन, गृहसंपर्क मोहीमेवर भर

Sangh's attempt at 'global reach' through Vijayadashami celebrations in the centenary year | शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवातून संघाकडून ‘ग्लोबल रिच’चा प्रयत्न

Sangh's attempt at 'global reach' through Vijayadashami celebrations in the centenary year

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे २ ऑक्टोबर रोजी रेशीमबाग मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे उपस्थित राहतील. शताब्दी वर्षातील कार्यक्रमाला ‘ग्लोबल रिच’ देण्याचा संघाचा प्रयत्न आहे. त्यासाठीच विविध देशांतील मान्यवर तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बोलविण्यात आले आहे. शताब्दी वर्षात संघाकडून गावपातळीवर गृहसंपर्क मोहीम राबवत हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी दिली.
नागपुरात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. संघाच्या विजयादशमी उत्सवात अमेरिका, थायलंड, इंडोनेशिया, दक्षिण अफ्रिका, घाना यासारख्या देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सोबतच लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता, डेक्कन उद्योग समुहाचे के. व्ही. कार्तिक आणि बजाज फिनसर्व्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज उपस्थित राहतील, अशी माहिती आंबेकर यांनी दिली. मागील वर्षी विजयादशमी उत्सवाला सात हजार स्वयंसेवक गणवेशात उपस्थित होते. यावेळी एकाच मैदानावर ही संख्या तिप्पट असेल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विदर्भ प्रांत संघचालक दीपक तमशेट्टीवार आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया हे देखील उपस्थित होते.

पंच परिवर्तनाबाबत समाजात जागृती
संघाकडून पुढील कालावधीत पंच परिवर्तनाच्या बिंदूंवर जागृती करण्यात येईल. यात पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, स्व आधारित व्यवस्था, कुटुंब प्रबोधन व नागरी कर्तव्य यांचा समावेश असेल.

नेपाळवर थेट भाष्य करणे टाळले

आंबेकर यांना नेपाळसंदर्भातदेखील विचारणा करण्यात आली.मात्र त्यांनी थेट भाष्य करणे टाळले. जगाला विविध षडयंत्रांपासून मुक्त करण्यासाठी हिंदू समाजाला मजबूत केला पाहिजे असे ते म्हणाले.

शताब्दी वर्षातील महत्वाचे कार्यक्रम

  • ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये सरसंघचालकांच्या संवाद सत्राचे आयोजन
  • २१ डिसेंबर रोजी कोलकाता येथे सरसंघचालकांच्या संवाद सत्राचे आयोजन
  • ७ व ८ फेब्रवारी रोजी मुंबईत सरसंघचालकांच्या संवाद सत्राचे आयोजन
  • मणिपूरमध्येदेखील विजयादशमी उत्सवाचे मोठे आयोजन

फेक नॅरेटिव्हला गृहसंपर्कातून दूर करणार

संघाबाबत समाजात गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न सुरू असतात. मात्र संघाविषयी संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांचे पितळ उघडे पडले आहे. आम्ही वर्षभर गृहसंपर्क करणार आहोत व त्या भेटींमधून संघाबाबतचे गैरसमज दूर करण्यात येतील. असे आंबेकर यांनी सांगितले.

समाजातून वसाहतवादी मानसिकता हटविण्यावर भर

यावेळी आंबेकर यांनी संघाच्या अजेंड्यावरदेखील भाष्य केले. आपल्या भारतातील अनेक तत्व अद्यापही वसाहतवादी मानसिकतेत जगतात. हीच मानसिकता हटवून स्व आधारित व्यवस्था आणण्यावर भर देण्याची गरज आहे असे ते म्हणाले. भारत हे हिंदू राष्ट्रच आहे. केवळ लोकांमध्ये आत्मभान जागृत करण्याची आवश्यकता आहे असेदेखील त्यांनी सांगितले.

Web Title: Sangh's attempt at 'global reach' through Vijayadashami celebrations in the centenary year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.