नागपूर मेट्रोच्या लिफ्टिंग होलमधून वाळू गळती; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2022 13:18 IST2022-04-12T13:11:45+5:302022-04-12T13:18:33+5:30
या ‘व्हायरल व्हिडीओ’मुळे महामेट्रोच्या कामावर प्रश्न उपस्थित करण्यात येत असून नागरिकांनी महामेट्रोवर निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा ठपका ठेवला आहे.

नागपूर मेट्रोच्या लिफ्टिंग होलमधून वाळू गळती; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
विराज देशपांडे
नागपूर : महामेट्रोच्या डबल डेकर पुलावरील इंदोरा स्क्वेअर ते दहा नंबर पुलिया या मार्गावर पिलर क्र. १०७ व १०८ च्या दरम्यान असलेल्या लिफ्टिंग होलमधून वाळू पडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या ‘व्हायरल व्हिडीओ’मुळे महामेट्रोच्या कामावर प्रश्न उपस्थित करण्यात येत असून नागरिकांनी महामेट्रोवर निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा ठपका ठेवला आहे. महामेट्रोने मात्र ही किरकोळ घटना असल्याची भूमिका घेतली आहे.
पुलाची साफसफाई करताना ही एक किरकोळ घटना घडली होती. तथापि, आमच्या लक्षात येताच आम्ही लवकरच या भागात बॅरिकेडिंग केले. मेट्रो कामाच्या दर्जासाठी ओळखली जाते, असे महामेट्रोचे प्रवक्ते अखिलेश हळवे यांनी सांगितले.
या घटनेचा व्हिडिओ ‘लोकमत’ने ट्विटरवर ‘शेअर’ केला व त्यानंतर तो ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाला. नेटिझन्सनी यावरून महामेट्रोवर विविध ‘कमेंट्स’ लिहिल्या.
एका ट्विटर युजरने लिहिले की, स्वच्छतेचे काम चालू असले पाहिजे.. पण योग्य सूचनेशिवाय असे फेकणे योग्य नाही. नक्कीच अपघात होऊ शकतो. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित केला गेला. महामेट्रोच्या गुणवत्तेशी तडजोड करण्यात आली आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही.
व्हिडीओ शेअर करताना अनेक नागरिकांनी पंतप्रधान कार्यालय तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच इतर ज्येष्ठ नेत्यांच्या अधिकृत खात्यांना टॅग केले आहे.
सोशल मीडिया वापरकर्त्यांपैकी एकाने लिहिले की, आता कोणावर कारवाई करणार? इतका निर्दयी. याला जबाबदार कोण? तर दुसऱ्याने या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्येही घबराट पसरली होती. पारडी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याची घटना आजही अनेकांच्या मनात ताजी आहे हे विशेष.