विक्रीकर उपायुक्ताची आत्महत्या : आज अंत्यसंस्कार
By Admin | Updated: June 7, 2014 02:25 IST2014-06-07T02:25:32+5:302014-06-07T02:25:32+5:30
मूळचे नागपूरचे असलेले नाशिक येथील विक्रीकर विभागाचे उपायुक्त अविनाश सूर्यभान जंगले

विक्रीकर उपायुक्ताची आत्महत्या : आज अंत्यसंस्कार
विक्रीकर उपायुक्ताची आत्महत्या : आज अंत्यसंस्कार
नागपूर : मूळचे नागपूरचे असलेले नाशिक येथील विक्रीकर विभागाचे उपायुक्त अविनाश सूर्यभान जंगले (५२) यांनी गुरुवारी पाथर्डी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांचा मृतदेह नागपूरकडे रवाना झाला असून उद्या शनिवारी सकाळी ७ वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
अविनाश जंगले हे मूळचे नागपूरचे असून मनीषनगर येथे त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या मागे पत्नी नीलिमा, दोन मुले व दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे कुटुंबीय मनीषनगर येथे राहतात. जंगले हे नाशिकला एकटेच राहत होते. पाथर्डी फाटा परिसरात विक्रीकर विभागाच्या कार्यालयाच्या अगदी शेजारी असलेल्या रो हाऊसेसमध्ये ते राहायचे. गुरुवारी ते कार्यालयात आले नव्हते. दुपारी खानावळीतून त्यांचा जेवणाचा डबा कार्यालयात आला. जंगले आले नसल्यामुळे प्रभाकर पांडे नावाचा कर्मचारी तो डबा घेऊन त्यांना देण्यासाठी घरी गेला असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. घरातील पंख्याला जंगले यांनी गळफास घेतला होता. संबंधित कर्मचार्याने तातडीने याची माहिती कार्यालयात दिली.
विक्रीकर विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलीसही दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी आत्महत्येशी संबंधित काही धागेदोरे मिळतात काय. याची छाननी केली, परंतु तसे काही आढळून आले नाही. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.
जंगले यांचे सासरे सुरेंद्र आवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जंगले हे शांत स्वभावाचे होते. आत्महत्या करण्यासारखे काहीही घडले नाही. त्यामुळे आम्हालाही धक्काच बसला आहे. त्यांचा लहान अनू याने नुकतेच १२ वीच्या परीक्षेत ८0 टक्के गुण घेतले होते. त्यामुळे घरचे सर्व आनंदातच होते. असे असतानाही त्यांनी गळफास का घेतला हा प्रश्न आम्हालाही पडला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा करीत आहोत. जंगले यांचा मृतदेह नागपूरसाठी रवाना झाला असून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तो पोहोचण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.(प्रतिनिधी)