Salary of teachers encircled in online, offline | ऑनलाईन, ऑफलाईनच्या विळख्यात शिक्षकांचे वेतन
ऑनलाईन, ऑफलाईनच्या विळख्यात शिक्षकांचे वेतन

ठळक मुद्देऑनलाईनमध्ये त्रुटी : ऑफलाईन बिल स्वीकारायला अधिकारी नाही तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षकांचे वेतन ऑनलाईन करण्यासाठी शासनाने शालार्थ प्रणाली आणली. पण या यंत्रणेत वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे शासनाकडून कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन वेतन करण्याचे निर्देश दिले जात आहे. गेली दोन महिने ऑफलाईन वेतन काढण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता तर सप्टेंबरचे वेतन ऑनलाईन होईल असे सांगितले होते. पण ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी अजूनही कायम आहे. त्यामुळे सप्टेंबर-२०१९ वेतन देयके संगणकात जनरेट होत नाही. तर वेतन अधीक्षक ऑफलाईन वेतन देयके स्वीकारायला तयार नाही.
शिक्षण विभागाकडून शिक्षकांचे वेतन जून महिन्यापासून शालार्थ प्रणालीतून ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सातारा, ठाणे, जालना जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतरांचे वेतन ऑनलाईन करण्यात येणार होते. मात्र, यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे संबंधित तीन जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्यापर्यंतचे वेतन ऑफलाईन काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वेतन पथक अधीक्षकाने ऑगस्ट महिन्यापर्यंतचे वेतन देयके ऑफलाईन स्वीकारले. सप्टेंबरपासून वेतन देयके ऑनलाईन स्वीकारण्याच्या सूचना शासनाच्या होत्या. त्यामुळे शाळांनी वेतन देयके ऑनलाईन भरण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑनलाईन प्रक्रियेत त्रुटी असल्याने वेतन देयके स्वीकारली जात नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहे. तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्याने वेतन देयके ऑफलाईन स्वीकारावी, अशी मागणी शिक्षकांची आहे.
जानेवारीपासून तांत्रिक पेच सुटला नाही
देशात 'डिजिटल इंडिया'चा नारा देत सर्व व्यवहार डिजिटल करण्यावर भर दिला जात असतानाच राज्यातील शिक्षण विभागाच्या शालार्थ सॉफ्टवेअरमध्ये झालेला तांत्रिक दोष नववा महिना लागल्यानंतरी दूर झालेला नाही. अशात शासनाने ऑनलाईन ऑफलाईनच्या सूचना वारंवार दिल्या. सप्टेंबरचे वेतन ऑनलाईन स्वीकारण्याच्या सूचना करताना यंत्रणेतील त्रुटी दुरुस्त झाल्या नाही. परिणामी वेतन देयके स्वीकारल्या गेली नाही. त्यामुळे १ ऑक्टोबरला वेतन मिळणार की नाही अशी भीती शिक्षकांना आहे.
शिक्षकांची वेतन देयके तयार होतात नेट कॅफेतून
शिक्षण विभागाने शिक्षकांच्या वेतनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा राबविली. परंतु ते कसे ऑपरेट करावे याचे प्रशिक्षण, माहिती लिपिक वर्गाला दिली नाही. त्यामुळे बहुतांश शाळेतील वेतन देयके ही नेट कॅफेतून काढली जात आहे. गेल्या नऊ महिन्यात ऑनलाईन प्रणाली दुरुस्त झाली नाही, वेतन देयके अजूनही बाहेरून भरावे लागत आहे. सर्वच अप्रशिक्षित असेल तर डिजिटलचा अट्टाहास का, उगाच शिक्षकांना मनस्ताप का, असा सवाल शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाचा वेठीस धरण्याचा प्रकार
एकीकडे ऑनलाईनची यंत्रणा ठप्प आहे. यासदंर्भात सचिव, आयुक्त, उपसंचालक, वेतन पथक अधीक्षक यांनाही जाणीव आहे. त्यामुळे ऑफलाईन देयके स्वीकारावी या मागणीसाठी आंदोलनही केले आहे. तरीसुद्धा मंगळवारी वेतन पथक अधीक्षकाने देयके ऑनलाईनच सादर करावे, अशा सूचना दिल्या आहे. हा प्रकार म्हणजे प्रशासनाकडून शिक्षकांना वेठीस धरण्याचा आहे.
प्रमोद रेवतकर, सचिव, विमाशी संघ

Web Title: Salary of teachers encircled in online, offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.