मनपा कर्मचाऱ्यांना सहाव्या आयोगानुसार वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 22:15 IST2019-09-20T22:13:56+5:302019-09-20T22:15:03+5:30

वेतन न मिळाल्याने महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याचा विचार करता प्रशासनाने ऑगस्ट महिन्याचे वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार देण्याचा निर्णय घेतला आहे.

Salary for employees of Municipal Corporation according to Sixth Pay Commission | मनपा कर्मचाऱ्यांना सहाव्या आयोगानुसार वेतन

मनपा कर्मचाऱ्यांना सहाव्या आयोगानुसार वेतन

ठळक मुद्देऑगस्ट महिन्याचे वेतन देण्याचे निर्देश : शासन निर्णयानंतर फरकासह सातवा वेतन आयोग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकार महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याला मंजुरी देतील अशा आशेवर कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन थांबले आहे. परंतु वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांची अडचणी वाढल्या आहेत. याचा विचार करता प्रशासनाने ऑगस्ट महिन्याचे वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार देण्याचा निर्णय घेतला आहे. शासन मंजुरीनंतर सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देताना फरकाची रक्कम देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली.
कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात येईल असे आश्वासन प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. त्यानुसार प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र महापालिकेचा प्रस्ताव नाकारून सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सुधारित प्रस्ताव पाठविला. परंतु राज्य सरकारने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. निर्णयाच्या प्रतीक्षेत ऑगस्ट महिन्याचे वेतन थांबले आहे. परंतु पुढील आठवड्यात होणारा बँक कर्मचाऱ्यांचा संप विचारात घेता शासन निर्णयाची अधिक प्रतीक्षा न करता सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शनिवारी वेतन देण्याला सुरुवात होणार आहे.
कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक सचिन कुर्वे तसेच नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी शुक्रवारी विशेष सभेनंतर पत्रकारांना दिली. राज्यातील इतर महापालिकेकडून वेतन आयोगाचे प्रस्ताव सादर करण्याला विलंब होत असल्याने सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन द्या, अशी सूचना म्हैसकर यांनी केल्याचे जोशी यांनी सांगितले. परंतु महापालिका आयुक्तांनी दुपारपर्यंत शासन निर्णयाची प्रतीक्षा करू अन्यथा सहाव्या वेतन आयोगानुसार ऑगस्ट महिन्याचे वेतन देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान शुक्रवारी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊ न वेतन आयोगासंदर्भात चर्चा केली.

शासन निर्णयानंतर फरकाची रक्कम देणार
सातव्या वेतन आयोगासंदर्भात अद्याप राज्य शासनाने निर्णय घेतलेला नाही. वेतनाला विलंब होत असल्याने सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम देण्यात येईल, अशी माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

आंदोलनात पुढाकार घेणारे कर्मचारी धास्तावले
महापालिकेत सातव्या वेतन आयोगासाठी आंदोलनात पुढाकार घेणाऱ्या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा हालचाली सुरू असल्याने कर्मचारी धास्तावले आहे. आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जाणीवपूर्वक बदल्या केल्यास या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे यांनी दिला आहे.

Web Title: Salary for employees of Municipal Corporation according to Sixth Pay Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.