साई प्रशिक्षण केंद्र सुरू होणार

By Admin | Updated: July 12, 2014 02:24 IST2014-07-12T02:24:19+5:302014-07-12T02:24:19+5:30

राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) विदर्भातील खेळाडूंसाठी मायेचा हात दिला आहे. नागपुरात बास्केटबॉल आणि हॅण्डबॉल या खेळाचे प्रशिक्षण उद्या शनिवारपासून उपलब्ध होणार आहे.

Sai Training Center will be started | साई प्रशिक्षण केंद्र सुरू होणार

साई प्रशिक्षण केंद्र सुरू होणार

नागपूर: राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) विदर्भातील खेळाडूंसाठी मायेचा हात दिला आहे. नागपुरात बास्केटबॉल आणि हॅण्डबॉल या खेळाचे प्रशिक्षण उद्या शनिवारपासून उपलब्ध होणार आहे. त्यासाठी साईने रातुम नागपूर विद्यापीठाचे सहकार्य घेतले असून दोन्ही खेळांचे प्रशिक्षण विद्यापीठ क्रीडांगण परिसरात होईल. या आशयाचे आदेश साईकडून विद्यापीठाला प्राप्त झाले.
या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे संचालक तसेच नागपूरचे माजी आंतरराष्ट्रीय हॅण्डबॉलपटू रूपकुमार नायडू म्हणाले,‘सध्या दोन खेळ सुरू करीत आहोत पण दोन- तीन महिन्यात बॅडमिंटन आणि अ‍ॅथ्लेटिक्सची देखील प्रशिक्षण कार्यक्रमात भर पडेल. भविष्यात किमान १२ खेळांचे प्रशिक्षण येथे व्हावे हे माझे स्वप्न आहे.’
ते पुढे म्हणाले,‘प्रशिक्षणात हॅण्डबॉलसाठी १३ मुले आणि १३ मुली तर बास्केटबॉलसाठी प्रत्येकी १६ मुले आणि मुलींची निवड करण्यात येईल. प्रशिक्षण अनिवासी आहे. गांधीनगर येथील साई केंद्राअंतर्गत कामकाज चालेल. रातुम नागपूर विद्यापीठ त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल तर साईद्वारे तज्ज्ञ प्रशिक्षक आणि खेळाडूंना देण्यात येणाऱ्या मानधनाची व्यवस्था केली जाईल. प्रशिक्षणासह प्रत्येक खेळाडूला चार हजार रुपये किमतीची किट, स्पर्धांसाठी दोन हजार रुपये आणि सहा हजार रुपये भत्ता दिला जाईल. याशिवाय वार्षिक १५० रुपयांचा विमा काढण्यात येणार आहे.’
शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पंकज देशमुख हे बास्केटबॉल तर नितीन गुजर हे हॅण्डबॉल प्रशिक्षण देणार आहेत. यावेळी उपस्थित असलेले विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे चेअरमन डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले,‘साई केंद्राच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना विद्यापीठाला प्राप्त होतील, अशी आशा आहे. यानिमित्ताने विद्यापीठाद्वारे सिंथेटिक ट्रॅक उभारणी आणि अन्य सुविधा वाढविण्याची शक्यता तपासण्यात येईल.’ यावेळी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. अशोक गोमासे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. धनंजय वेळूकर आदी उपस्थित होते.(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Sai Training Center will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.