सफेलकर ईशाकचाही लावणार होता स्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST2021-04-16T04:08:47+5:302021-04-16T04:08:47+5:30
नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - फरारीच्या काळात अय्याशीचे जीवन जगणारा ईशाक मस्ते नाकापेक्षा मोती जड झाल्यासारखा झाल्यामुळे ...

सफेलकर ईशाकचाही लावणार होता स्पॉट
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - फरारीच्या काळात अय्याशीचे जीवन जगणारा ईशाक मस्ते नाकापेक्षा मोती जड झाल्यासारखा झाल्यामुळे कुख्यात रणजित सफेलकरने त्याचाही स्पॉट लावण्याची तयारी केली होती. मात्र, गुन्हे शाखेने अटक केल्यामुळे सफेलकरचा गेम उधळला गेला. सध्या सफेलकर आणि मस्ते दोघेही गुन्हे शाखेच्या कोठडीचा पाहुणाचार घेत असून, त्यांच्याच चाैकशीतून हा धक्कादायक खुलासा झाल्याचे समजते.
स्वत:ला श्रीराम सेनेचा स्वयंघोषित अध्यक्ष म्हणवून घेत नेतागिरी करणारा आणि एकावर एक हत्येचे गुन्हे करणारा, खंडणी वसुली आणि जमिनी बळकावत सुटलेला कुख्यात सफेलकर गुन्हेगारीसोबत राजकारणातही सैराट झाला होता. मात्र, पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांची वक्रदृष्टी त्याच्या कुंडलीवर पडली. त्यानंतर सफेलकरच नव्हे तर त्याच्या टोळीतील गुंडांचेही ग्रह फिरले. गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी सूक्ष्म तपास करीत एकनाथ निमगडेंची हत्या पाच कोटींची सुपारी घेऊन सफेलकरने घडवून आणल्याचे तसेच मनीष श्रीवासचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचे दोन गुन्हे लागोपाठ पोलिसांनी उघड केले. या गुन्ह्यात सफेलकरचे राईट आणि लेफ्ट हॅण्ड असलेल्या कालू आणि भरत हाटेच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्यानंतर हेमंत गोरखा आणि खुद्द सफेलकरला बेड्या ठोकल्या. त्यांच्या आजपर्यंतच्या चाैकशीत हत्येचे तीन गुन्हे, जमिनी, फ्लॅट, दुकाने आणि संस्था तसेच शाळा बळकावण्याचे २५ पेक्षा जास्त गुन्हे उघड झाले आहेत.
अटक करण्याच्या चार महिन्यापूर्वी मनीषच्या हत्याकांडाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे सफेलकरला कळले. त्यामुळे सफेलकर आणि या गुन्ह्यात सहभागी असलेले त्याचे सर्व साथीदार इकडे तिकडे फरार झाले. त्यांचा सर्व खर्च सफेलकरच भागवत होता. मनीषचे अपहरण करून हत्या करेपर्यंतच्या गुन्ह्यात सहभागी असलेला ईशाक मस्ते मध्य प्रदेशातील बिडगाव जिल्ह्यात राहत होता. ईशाकला फाईव्ह स्टार लाईफ जगण्याची सवय पडली. बाई, बाटलीच नव्हे तर महागडे कपडे, शूज अन् परफ्यूमही तो वापरत होता. त्यासाठी तो सफेलकरला अधूनमधून कधी २०, कधी ५० हजार तर कधी १ लाख रुपये मागायचा. त्याची पैशाची मागणी वाढतच चालली होती. ती पूर्ण केली नाही तर पोलिसांकडे जाऊन तो सर्व काही सांगू शकतो, असाही धाक निर्माण झाला होता. त्यामुळे सफेलकरने ईशाकचाही गेम करण्याची तयारी केली होती. त्याचा स्पॉट लावण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी सफेलकरच्या मुसक्या बांधल्या आणि त्याचा डाव उधळला.
---
अभी तो पिक्चर बाकी है...।
पोलिसांकडे सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी केलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तक्रारी आणि पुरावे मिळाल्याच्या वृत्ताला पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी सांगितले आहे. पाच ते सात दिवसात या टोळीवर पुन्हा एक हत्येचा गुन्हा आणि अन्य काही गुन्हे दाखल होऊ शकतात, असेही वृत्त आहे.
----
---