आॅनलाईन लोकमतनागपूर : सफाई कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या नगरसेविकेच्या पतीची संतप्त सफाई कामगारांनी बेदम धुलाई केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. संतप्त कर्मचाऱ्यांनी नंतर यशोधरानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली.सफाई कामगार संघटनेतर्फे मोहम्मद फिरोज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रभाग क्रमांक ३ च्या भाजपा नगरसेविका नसीम बानो इब्राहिम खान यांचे पती रोज प्रभागात सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात. त्यांच्या हजेरीचे रजिस्टर हातात घेऊन मनात येईल त्याची गैरहजेरी लावतात. संबंध नसताना त्यांना मानसिक त्रास देतात. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा हा त्रास कर्मचाऱ्यांना सुरू आहे. यासंबंधाने उजर केल्यास ते अपमानास्पद वागणूक देतात. बुधवारी सकाळी असाच प्रकार झाला. एका कर्मचाऱ्यासोबत त्यांनी वाद घालून अपमानित केले. हा प्रकार पाहून अन्य काही महिला कर्मचाऱ्यांनी हरकत घेतली असता इब्राहिम खान त्यांच्यासोबतही वाद घालू लागले. त्यांच्या वर्तनाने आधीच त्रस्त असलेल्या महिला-पुरुष कर्मचाऱ्यांचा रोष उफाळून आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी इब्राहिम यांना बेदम मारहाण केली. मारहाण करण्यात काही महिलाही पुढे होत्या. ते यशोधरानगर पोलीस ठाण्यात धावत गेले असता, जमावाने त्यांचा पाठलाग करून त्यांना ठाण्याच्या परिसरातही चोप दिला. त्यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत पोलीस ठाण्याच्या आवारात तणाव होता. पोलिसांनी जमावाची कशीबशी समजूत काढून त्यांना शांत केले.महापालिका आयुक्तांकडेही तक्रारअधिकार नसताना नगरसेविकेचा पती कर्मचाऱ्यांना त्रास देतो, त्यांना दमदाटी करतो, अशाप्रकारची लिखित तक्रार कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांकडे दिली. हिवाळी अधिवेशन सुरू असताना सत्तापक्षातील एका नगरसेविकेच्या पतीने चालविलेली दादागिरी या प्रकरणातून पुढे आल्यामुळे प्रकरण चिघळण्याचे संकेत आहेत.
नागपुरात सफाई कामगारांनी केली नगरसेविकेच्या पतीची धुलाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 20:45 IST
सफाई कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या नगरसेविकेच्या पतीची संतप्त सफाई कामगारांनी बेदम धुलाई केली.
नागपुरात सफाई कामगारांनी केली नगरसेविकेच्या पतीची धुलाई !
ठळक मुद्देपोलीस ठाण्यासमोरही मारहाण : यशोधरानगरात तणाव