ग्रामीण आरोग्य व्यवस्था सलाईनवर

By Admin | Updated: November 23, 2014 00:36 IST2014-11-23T00:36:52+5:302014-11-23T00:36:52+5:30

ग्रामीण भागातील सरकारी रु ग्णालयांमध्ये अनेक समस्या आहेत. यातच डॉक्टरांच्या ३४८ रिक्त पदांमुळे अनेक रु ग्ण आरोग्याच्या सुविधांपासून वंचित राहतात. रुग्णालयांमध्ये डॉक्टरच नसल्याने

Rural health system on saline | ग्रामीण आरोग्य व्यवस्था सलाईनवर

ग्रामीण आरोग्य व्यवस्था सलाईनवर

डॉक्टरांची ३४८ पदे रिक्त : मेयो, मेडिकलमध्ये वाढली गर्दी
नागपूर : ग्रामीण भागातील सरकारी रु ग्णालयांमध्ये अनेक समस्या आहेत. यातच डॉक्टरांच्या ३४८ रिक्त पदांमुळे अनेक रु ग्ण आरोग्याच्या सुविधांपासून वंचित राहतात. रुग्णालयांमध्ये डॉक्टरच नसल्याने आरोग्य व्यवस्था ‘सलाईन’वर असल्याचे चित्र आहे. परिणामी रु ग्णांना उपचारांकरिता शहराकडे धाव घ्यावी लागत असून मेयो, मेडिकल व डागा रुग्णालयांत गर्दी वाढली आहे.
सार्वजनिक आरोग्य संस्थेमार्फत सहा जिल्ह्यांमध्ये आरोग्यसेवा पुरविली जाते. या जिल्ह्यांमध्ये नागपुरातील एका प्रादेशिक रुग्णालयासोबतच ५ जिल्हा रुग्णालये, २ महिला रुग्णालये, ५० खाटांचे १० उपजिल्हा रुग्णालये, १०० खाटांचे ३ उपजिल्हा रुग्णालये, ५१ ग्रामीण रुग्णालये, २५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १६४३ उपकेंद्रे कार्यरत आहेत.
विभागातील या रुग्णालयांमध्ये वर्ग १ च्या तज्ज्ञांची एकूण २४१ पदे मंजूर आहेत. परंतु, ८६ पदे भरण्यात आली असून, १५५ पदे रिक्त आहेत. वर्ग २ ची एकूण १०६३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ८७० पदे भरण्यात आली असून, १९३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची एकूण संख्या ६४ टक्के आहे.
जेवढी पदे भरली नाहीत, त्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. मागील अनेक वर्षांपासून हीच स्थिती आहे.
शासनाच्या धोरणामुळे ग्रामीण भागात डॉक्टर काम करण्यास धजावत नाहीत. रिक्त पदे न भरणे हेच आरोग्याच्या सुविधा न मिळण्यास कारणीभूत आहे.
मागील वर्षांमध्ये आघाडी शासनाने ग्रामीण आरोग्यासाठी अनेक घोषणा केल्या, परंतु अद्यापही काहीच झाले नाही. डॉक्टरांच्या नियुक्तीसंदर्भात यापूर्वीही शासनाला कळविण्यात आले, परंतु तिजोरी खाली असल्याचे कारण दाखवून शासनाने टाळाटाळ केली.
शासनाने महिलांसाठी जननी सुरक्षा योजना सुरू केली पण डॉक्टरांच्या कमतरतेमुळे ग्रामीण रुग्णांना अजूनही नागपुरातच उपचारासाठी यावे लागत आहे. १३०४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९५६ पदे भरण्यात आली असून, अजूनही १५५ विशेषज्ज्ञांची पदे रिक्त आहेत. (प्रतिनिधी)
आरोग्य विभाग ‘रेफर’वर अवलंबून
शासनाचा सर्वात जास्त निधी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयापेक्षा (डीएमईआर) आरोग्य विभागावर खर्च होतो परंतु विदर्भाचा विचार केल्यास येथील ग्रामीण आरोग्य व्यवस्था फक्त ‘रेफर’वर अवलंबून आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची स्थिती खराब असल्याने डॉक्टर साधे औषध देऊन रुग्णांना मेडिकल, मेयो किंवा डागा रुग्णालयांमध्ये ‘रेफर’ करतात. साधारण ६० टक्के रुग्णांना शहरात ‘रेफर’ केले जात असल्याची माहिती आहे.

Web Title: Rural health system on saline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.