ग्रामीण आरोग्य व्यवस्था कोलमडली

By Admin | Updated: December 18, 2015 03:21 IST2015-12-18T03:21:07+5:302015-12-18T03:21:07+5:30

विविध विषयातील स्पेशालिस्ट (विशेषज्ञ) डॉक्टरांना गावखेड्यात आपली सेवा देण्यास ‘अ‍ॅलर्जी’ असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा लंगडी झाली आहे.

Rural health system collapses | ग्रामीण आरोग्य व्यवस्था कोलमडली

ग्रामीण आरोग्य व्यवस्था कोलमडली

स्पेशालिस्ट डॉक्टरांची २९७ पदे रिक्त : आरोग्य विभाग केवळ ‘रेफर’वर अवलंबून
सुमेध वाघमारे नागपूर
विविध विषयातील स्पेशालिस्ट (विशेषज्ञ) डॉक्टरांना गावखेड्यात आपली सेवा देण्यास ‘अ‍ॅलर्जी’ असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा लंगडी झाली आहे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहचली पाहिजे, असे शासन म्हणत असले तरी त्यादृष्टीने प्रयत्न होत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. सद्यस्थितीत विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टरांची तब्बल २९७ पदे रिक्त आहेत.
नागपूर मंडळातील आरोग्य संस्थेच्या अंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा असे सहा जिल्हे येतात. यात पाच जिल्हा रुग्णालये, दोन स्त्री रुग्णालये, तीन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालये, दहा ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालये, ५१ ग्रामीण रुग्णालये, २५१ प्राथमिक आरोग्य केंद्र तर १६४३ उपकेंद्र आहेत. या रुग्णालयांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा दिली जाते. विशेष म्हणजे, मागील सहा महिन्याचा विचार केला तर या सहा जिल्ह्यांमध्ये ५८ लाख ३४ हजार ८२७ रुग्णांनी उपचार घेतले. परंतु स्पेशालिस्ट डॉक्टरांचा वानवा असल्याने अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी शहरातील खासगी इस्पितळांसह नागपुरातील मेडिकल, मेयोमध्ये धाव घ्यावी लागली आहे. यामुळे आरोग्य विभागाचाच आरोग्य सेवा देण्याचा उद्देश पूर्ण होत नसल्याचे स्पष्ट होते. मंडळांतर्गत येणाऱ्या या रुग्णालयांमध्ये विविध स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या ६०२ पदांना मंजुरी प्राप्त आहे. परंतु ग्रामीण भागांमध्ये जाऊन सेवा देण्यास डॉक्टर तयार नसल्याने मंडळाला फक्त ३०५ पदेच भरणे शक्य झाले आहे. २९७ जागा रिक्त असल्याने कामावर असलेल्या डॉक्टरांवरच कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. परिणामी योग्य आरोग्य सेवा देण्यास ही रुग्णालये कमी पडत असून रुग्णांना नागपूरच्या मेयो, मेडिकल व डागा रुग्णालयात पाठविण्याचा सपाटा सुरू आहे.

विना लाभ विशेषज्ञ कसे मिळणार
मागील वर्षांमध्ये शासनाने ग्रामीण आरोग्यासाठी अनेक घोषणा केल्या, परंतु अद्यापही काहीच झाले नाही. डॉक्टरांच्या नियुक्तीसंदर्भात यापूर्वीही शासनाला कळविण्यात आले. परंतु तिजोरी खाली असल्याचे कारण दाखवून शासनाने टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर आली आहे. शासनाने महिलांसाठी जननी सुरक्षा योजना सुरू केली. परंतु डॉक्टरांच्या कमतरतेमुळे ग्रामीण रुग्णांना अजूनही नागपुरातच उपचारासाठी यावे लागत आहे.
मृत्यूचे प्रमाण वाढतेय!
नागपूर मंडळातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्ण आहेत, परंतु विशेषज्ञ नाही अशी गंभीर स्थिती आहे. नवनवीन आणि गुंतागुंतीचे आजार वाढले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील बालके, महिला तसेच वृद्धांवर तत्काळ उपचार मिळण्यास उशीर होत आहे. विभागाकडे रुग्णालये, औषधांचा साठा असूनही केवळ विशेषज्ञ नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

Web Title: Rural health system collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.