धावत्या वाहनाने घेतला पेट : सुदैवाने प्राणहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 20:41 IST2018-02-02T20:38:45+5:302018-02-02T20:41:38+5:30
भाजीपाला घेऊन जात असलेल्या धावत्या छोट्या मालवाहू वाहनाने अचानक पेट घेतला. वाहनचालक व मालकाने वेळीच सावधगिरी बाळगत वाहन सोडून पळ काढला. त्यामुळे यात कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोराडी-नागपूर मार्गावरील मॉडर्न स्कूल टी पॉर्इंटजवळ शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

धावत्या वाहनाने घेतला पेट : सुदैवाने प्राणहानी टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
कोराडी : भाजीपाला घेऊन जात असलेल्या धावत्या छोट्या मालवाहू वाहनाने अचानक पेट घेतला. वाहनचालक व मालकाने वेळीच सावधगिरी बाळगत वाहन सोडून पळ काढला. त्यामुळे यात कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोराडी-नागपूर मार्गावरील मॉडर्न स्कूल टी पॉर्इंटजवळ शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
सचिन मोरे आणि केशव भातूलकर, दोघेही रा. इसापूर, ता. सावनेर यांनी एमएच-४०/वाय-२५४४ क्रमांकाच्या छोट्या मालवाहू वाहनात इसापूर येथील काही शेतकऱ्यांकडील भााजीपाला भरला आणि तो विकण्यासाठी नागपूर जाण्यास निघाले. सचिन वाहन चालवित होता. ते मॉडर्न स्कूलजवळ पोहोचताच वाहनाच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणात धूर निघायला सुरुवात झाली. त्यामुळे सचिनने वाहन रोडवर थांबवून उडी मारत पळ काढला. त्या पाठोपाठ केशव भातुलकरही वाहन सोडून दूरवर गेले. दोघांनीही या प्रकाराची माहिती लगेच कोराडी पोलिसांना दिली.
पोलिसांनी तत्काळ कोराडी वीज केंद्रातील अग्निशमन दलाचे वाहन पाठविले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करीत आग नियंत्रणात आणली. वाहन रोडच्या मध्यभागी जळत असल्याने या मार्गावरील नागपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. या घटनेत इसापूर येथील नारायण मोरे, सीमा बावणे, मोरेश्वर मोरे, बेबी शेंडे या शेतकऱ्यांचा भाजीपाला जळून खाक झाल्याने त्यांचे व वाहन मालकाचे नुकसान झाले.