धावत्याला येई शक्ती
By Admin | Updated: August 10, 2015 02:57 IST2015-08-10T02:53:22+5:302015-08-10T02:57:35+5:30
घरात अठराविश्वे दारिद्र्य. अभ्यासात मन नव्हते अन् समोर काय करायचे हे माहीत नव्हते.

धावत्याला येई शक्ती
सचिन बुरघाटे यांचा यशाचा मंत्र : ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’मधून उलगडले अंतरंग
नागपूर : घरात अठराविश्वे दारिद्र्य. अभ्यासात मन नव्हते अन् समोर काय करायचे हे माहीत नव्हते. संघर्ष सुरू होता, पण त्याला दिशा नव्हती. पण काही ‘टर्निंग पॉर्इंट्स’ आले अन् आयुष्य नव्या रूपाने जगण्याचा मंत्रच गवसला. मंत्र होता सदैव चालत राहण्याचा, न थांबता अविरत परिश्रम करण्याचा. यातूनच आज मी हजारो माणसे घडवतोय. हे शब्द आहेत लाखो युवकांसाठी आदर्श प्रस्थापित करणाऱ्या सचिन बुरघाटे यांचे. ‘प्रयास सेवांकुर’तर्फे आयोजित ‘आम्ही बिघडलो, तुम्ही बी घडाना’ या कार्यक्रमात बुरघाटे यांनी आपल्या यशाचे अंतरंग सर्वांसमोर उलगडले.
बी.आर.ए. मुंडले सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमात ह्यप्रयासह्णचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी बुरघाटे यांची मुलाखत घेतली. सचिन बुरघाटे यांची अकोला येथे ‘अस्पायर’ नावाची संस्था असून, या माध्यमातून ते दरवर्षी सर्व वयोगटातील हजारोंना इंग्रजी शिकविण्यासोबतच त्यांच्यात आत्मविश्वासदेखील जागृत करतात. बुरघाटे यांनी यावेळी अकोला जिल्ह्यातील लाडेगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा ते सातासमुद्रापार मारलेली मजल या आपल्या प्रवासातील अनुभव मांडले. लहानपणी पायात चप्पल घालणे म्हणजे काय हे माहीत नव्हते. बारावीपर्यंत तर आत्मविश्वास दूरदूरपर्यंत नव्हता. परंतु बारावीच्या वर्गात असताना एका चाचणीत पहिला क्रमांक आला अन् बाकापासून ते मंचापर्यंत बक्षिसाचे पेन स्वीकारायला जाताना अवघ्या १० पावलांत माझ्यातला ‘मी’ दिसला. त्यानंतर ‘डीएड’मध्ये प्रवेश घेतला, पण मन लागले नाही म्हणून सोडून दिले.
एक वेळी जेवून ‘एमबीए’ झालो, पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरीला लागलो. पण तिथेदेखील समाधान मिळत नसल्याने बाहेर पडलो. अखेर ‘अस्पायर’ नावाची संस्था सुरू केली. लोकांनी वेड्यात काढले. पण मी ठरवले होते, थांबायचे नाही. आज हजारो तरुणांच्या मनात आत्मविश्वास जागवतो आहे. हेच माझ्या आयुष्याचे ‘मिशन’ आहे, असे सचिन यांनी सांगितले.
आपल्या आयुष्यातील बराचसा वेळ हा लोकांना भेटण्यातच जातो. स्वत:शी आपण भेटतच नाही. त्यामुळे अनेकदा पारंपरिक चौकटीतच अडकून राहतो.अनेक संकटांच्या खाचखळग्यांमधून मी उभा ठाकलो. थांबायचे नाही, ही एकच माझी जिद्द होती.
हीच शिकवण मी माझ्या देश-विदेशातील विद्यार्थ्यांना देतो असेदेखील सचिन बुरघाटे यांनी सांगितले. बुरघाटे यांचे अनुभव ऐकण्यासाठी सभागृह ‘हाऊसफुल्ल’ झाले होते.(प्रतिनिधी)