तुकाराम मुंढेंवर कारवाईसाठी सत्ताधारी विधानसभेत आक्रमक; आ. खोपडेंना धमकी देणाऱ्यावर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 06:13 IST2025-12-10T06:12:08+5:302025-12-10T06:13:18+5:30
काही मर्जीतल्या कंत्राटदारांना २० कोटी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले होते. काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली होती. दोन्ही प्रकरणांचे एफआयआर तेव्हा पोलिसांकडे दाखल झाले होते, असेही खोपडे म्हणाले.

तुकाराम मुंढेंवर कारवाईसाठी सत्ताधारी विधानसभेत आक्रमक; आ. खोपडेंना धमकी देणाऱ्यावर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
नागपूर : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या समर्थकाने भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांना फोनवर धमकी दिल्याचा मुद्दा मंगळवारी विधानसभेत गााजला. सत्ताधाऱ्यांनी या मुद्यावर कामकाजही बंद पाडले. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमकी देणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वस्त करीत मुंढे यांच्या बाबतची सर्व माहिती घेऊन वस्तुस्थितीदर्शक निवेदन केले जाईल, असे स्पष्ट केले.
आ. कृष्णा खोपडे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत या मुद्याकडे सरकारचे लक्ष वेधले. नागपुरातील ‘स्मार्ट सिटी प्रकल्पा’त मुंढे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरणारी लक्षवेधी लावल्यानंतर मुंढे समर्थकाने आपल्याला फोन करून धमकी दिल्याची तक्रार आ. खोपडे यांनी केली. त्यांनी काही मर्जीतल्या कंत्राटदारांना २० कोटी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले होते. काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली होती. दोन्ही प्रकरणांचे एफआयआर तेव्हा पोलिसांकडे दाखल झाले होते, असेही खोपडे म्हणाले.
काँग्रेसचे गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी मुंढे यांची बाजू घेतली. आमदारांना धमकी देणाऱ्यावर नक्की कारवाई करा, पण सत्यस्थिती पडताळून पाहा. तत्कालीन आयुक्तांनी मुंढे यांचा दोष नसल्याचे स्पष्ट केले होते. महिला आयोगानेही तक्रारकर्त्या महिला कर्मचाऱ्यांवरच ताशेरे ओढले होते.