आरटीओचे पाऊल पडते मागे!
By Admin | Updated: March 14, 2015 02:45 IST2015-03-14T02:45:54+5:302015-03-14T02:45:54+5:30
राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना गेल्या चार महिन्यांपासून ...

आरटीओचे पाऊल पडते मागे!
नागपूर : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना गेल्या चार महिन्यांपासून वाहनांचे नोंदणीपुस्तक (आरसी बुक) पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून दिले जात आहे. विशेष म्हणजे, आरसीबुक आॅप्टिकल स्मार्ट कार्ड स्वरूपात तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या खासगी कंपनी ‘शाँग’शी करार संपला. सहा महिन्यांसाठी दिलेली मुदतवाढही संपली. परंतु दहा महिन्यांवर कालावधी होऊनही परिवहन विभागाने कुठलीही हालचाल न केल्याने याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. राज्यभरात एक लाख आरसी प्रलंबित असल्याची माहिती आहे.
नवीन नोंदणी झालेल्या वाहनांना आरटीओ कार्यालयातर्फे पूर्वी आरसी बुक कागदी पुस्तिकेच्या स्वरूपात दिले जात होते. मात्र, ते सांभाळणे खूप जिकिरीचे होते. तंत्रज्ञानातील बदल ओळखून परिवहन विभागाने २००६ मध्ये ‘शाँग’ या खासगी कंपनीला आरसी बुक स्मार्ट कार्डच्या स्वरूपात तयार करून देण्याचे कंत्राट दिले.
जून २०१४ मध्ये हे कंत्राट संपले. या कंत्राटदाराला दिलेली सहा महिन्यांची मुदतवाढही नोव्हेंबर अखेरीस संपली आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या तारखेपासून नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांना कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बुक देणे सुरू झाले. परंतु आरटीओकडे आधीच तोकडे मनुष्यबळ असताना या नव्या कामाची भर पडल्याने दिवसाकाठी सुमारे ३० आरसी बुक कागदी पुस्तिकेच्या स्वरूपात तयार होत आहे. पूर्वी स्मार्ट कार्डच्या स्वरूपात हेच आरसीबूक शंभरावर तयार व्हायची. गेल्या चार महिन्यांपासून आरसीची प्रलंबित संख्या वाढून राज्यभरात १ लाखाच्यावर गेल्याची माहिती आहे. परिणामी राज्यभरातील ५० प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणीधारकांमध्ये संताप आहे.(प्रतिनिधी)