शताब्दीनिमित्त विद्यापीठाचा ‘रिच टू अनरिच्ड’ उपक्रम, ग्रामीण भागात देणार रोजगाराचे धडे
By जितेंद्र ढवळे | Updated: August 17, 2023 13:49 IST2023-08-17T13:48:20+5:302023-08-17T13:49:35+5:30
ग्रामीण भागात कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरू करून येथील नागरिकांना रोजगारक्षम करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न

शताब्दीनिमित्त विद्यापीठाचा ‘रिच टू अनरिच्ड’ उपक्रम, ग्रामीण भागात देणार रोजगाराचे धडे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘रिच टू अनरिच्ड’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागात रोजगार तसेच स्वयंरोजगाराची साधने नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा तसेच विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या अंतर्गत नागपूर विद्यापीठ व मुंबई येथील समता फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्ह्यातील कोकना-खोबा येथे रूपलता देवाजी कापगते महाविद्यालयात फॅशन डिझायनिंग लॅबचे उद्घाटन करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्या उपस्थितीत फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली. ग्रामीण भागातील महिलांना अद्यावत फॅशन डिझायनिंगची माहिती मिळावी, हा या लॅबचा प्रमुख उद्देश्य आहे.
ग्रामीण भागात कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरू करून येथील नागरिकांना रोजगारक्षम करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचा मनोदय यावेळी प्र-कुलगुरू डॉ. दुधे यांनी व्यक्त केला. समता फाउंडेशनच्या स्मिता कांबळे, संस्थेचे सचिव डॉ. देवाजी कापगते व अध्यक्ष रूपलता कापगते, आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक के. एम. गहाणे, समता फाउंडेशनचे पदाधिकारी आहित्य उकरकर, कैलास मरकाम आदी यावेळी उपस्थित होते.