लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि वंचित घटकांमधील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात खासगी शाळांत 'आरटीई' प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. नागपूर जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जागा वाढल्या आहेत. परंतु मागील काही वर्षात जागा मोठ्याप्रमाणात रिक्त राहत असल्याने शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मधील प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रियेला आज मंगळवारी १४ जानेवारीपासून सुरुवात होत असून, ती २७ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये राज्यभरातील ९ हजार २१७ खासगी शाळांतील एक लाख पाच हजार २३७ रिक्त जागांपैकी ७८ हजार ३८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे २५ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. नागपूर जिल्ह्यातील ६ हजार ९२० जागांपैकी एक हजार ६२८ जागा रिक्त राहिल्या. प्रवेश प्रक्रिया दिवाळीपर्यंत सुरु राहात असल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहतात. याचा विचार करता आरटीईअंतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणारी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मंगळवारी १४ जानेवारीला सुरू झाली आहे. त्यामुळे यंदा पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा लवकर उपलब्ध होणार आहे. सध्या या प्रवेशप्रक्रियेत शाळांची नोंदणी सुरू असून नागपूर जिल्ह्यातील ६४६ शाळांनी नोंदणी केली आहे.
एप्रिलपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार सध्या अनेक खासगी शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. खासगी शाळांकडून जानेवारी महिन्यापर्यंत आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून, एप्रिल महिन्यात काही काळासाठी शाळा सुरू करण्यात येतात. त्यानंतर जूनपासून नियमित शाळा सुरू होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाला एप्रिल महिन्यापर्यंत 'आरटीई' प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.