‘आर्य बाहेरून आले हे असत्य ब्रिटिशांनी रुजविले’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 09:32 IST2024-12-27T09:27:02+5:302024-12-27T09:32:10+5:30
लोकांच्या मनातून ते काढण्यासाठी वेळ लागतोय, अशी खंत भागवत यांनी व्यक्त केली

‘आर्य बाहेरून आले हे असत्य ब्रिटिशांनी रुजविले’
नागपूर : आर्य बाहेरून भारतात आले हे असत्य ब्रिटिशांनी रुजविले असून, हा सिद्धांत संपूर्ण जगाने नाकारला आहे, असा दावा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी सोमलवार शिक्षण संस्थेच्या संस्थापक दिन कार्यक्रमात बोलताना केला.
भारतात जात, धर्म, पंथ, संस्कृती, भाषा अशी अनेक प्रकारची विविधता आहे. त्यामुळे भारतातील नागरिक भांडतात. परंतु परकीय आक्रमण झाल्यानंतर ते संघटित होऊन लढतात, हे इंग्रजांना कळले होते. परिणामी, त्यांनी भारतीयांना खोटा इतिहास सांगून त्यांच्यात भेदभावाचे वातावरण निर्माण केले. भारतात स्थानिक कोणीच नाही, ही निराधार गोष्ट त्यांनी मनात भरवली. द्रविडांनी भारतात आल्यानंतर त्यावेळच्या राज्यकर्त्यांना हाकलून लावले. त्यानंतर आर्यांनी द्रविडांना बाहेर काढले. भारतात सर्वजण बाहेरूनच आले आहेत. भारतावर बाहेरच्या लोकांनीच राज्य केले आहे. राज्य करणे भारतीयांच्या रक्तात नाही, असे इंग्रजांनी सांगितले. हे असत्य त्यांनी आपल्या अज्ञानामुळे पसरवले. हा इतिहास खोटा आहे. याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. परंतु, लोकांच्या मनातून ते काढण्यासाठी वेळ लागतोय, अशी खंत भागवत यांनी व्यक्त केली.
केवळ पोट भरणे शिक्षणाचा उद्देश नाही. व्यक्तीला मनुष्य बनविणे, माणुसकीने जगण्याची कला शिकविण्यासाठी शिक्षण आहे, याकडे भागवत यांनी लक्ष वेधले.