अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मंत्री, आमदारांचे ‘संघ दक्ष’, सकाळी पोहोचणार संघस्थानी
By योगेश पांडे | Updated: December 13, 2025 00:21 IST2025-12-13T00:21:01+5:302025-12-13T00:21:14+5:30
योगेश पांडे नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण राज्य सरकार नागपूर मुक्कामी आहे. हा मुहूर्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ...

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मंत्री, आमदारांचे ‘संघ दक्ष’, सकाळी पोहोचणार संघस्थानी
योगेश पांडे
नागपूर: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण राज्य सरकार नागपूर मुक्कामी आहे. हा मुहूर्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महायुतीच्या सर्व मंत्री व आमदारांना रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात येण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात हे आयोजन करण्यात आले आहे. संघाचे शताब्दी वर्ष व आगामी महानगरपालिका निवडणूका यामुळे याचे महत्त्व वाढले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) आमदार येणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
संघाकडून आमदारांसाठी दरवर्षी अधिवेशन काळात उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येते होते. यावेळी त्यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात कार्याबाबत माहिती देण्यात येते. यंदा केवळ सात दिवसच अधिवेशन असल्याने संघाकडून परिचय वर्ग होणार नाही अशी चर्चा होती. मात्र अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी महायुतीतील सर्व आमदारांना रेशीमबागेत येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी आमदार व मंत्री रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात सकाळी ८ वाजता जाऊन आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर महर्षी व्यास सभागृहात सर्वांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.
संघ विचार आणि अपेक्षांवर राहणार भर
भाजपाच्या एखाद्या मंत्र्याने कुठलीही गैरवर्तणूक केली तर ‘स्वयंसेवक’ बिघडला, अशी टीका होते. शिवाय विविध घटनांमुळे मंत्र्यांवर ताशेरेदेखील ओढण्यात येत आहेत. जनतेच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत आमदार व मंत्र्यांचे नेमके आचरण कसे हवे आणि जनताहितासाठी कुठल्या बाबींमध्ये पुढाकार घ्यायला हवा, याबाबत मार्गदर्शन करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच संघाची विचारधारा आणि अपेक्षा याबाबतदेखील ‘बौद्धिक’ देण्यात येईल, अशी महिती सूत्रांनी दिली आहे.