संघाच्या मुख्यालयात बरेच वर्षे तिरंगा का फडकावला नव्हता? मोहन भागवत यांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 09:53 AM2023-09-07T09:53:16+5:302023-09-07T09:54:23+5:30

अखंड भारत, आरक्षण या मुद्द्यांवरही मांडले मत

RSS chief Mohan Bhagwat says Our People are always ahead to sacrifice life for India and respected Indian flag | संघाच्या मुख्यालयात बरेच वर्षे तिरंगा का फडकावला नव्हता? मोहन भागवत यांनी दिलं उत्तर

संघाच्या मुख्यालयात बरेच वर्षे तिरंगा का फडकावला नव्हता? मोहन भागवत यांनी दिलं उत्तर

googlenewsNext

Mohan Bhagwat Indian Flag at RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आपली भूमिका प्रखरपणे आणि अतिशय स्पष्ट शब्दांत मांडण्यासाठी ओळखले जातात. मोहन भागवतांनी नुकतेच नागपुरात एका विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. 1950 ते 2002 या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुख्यालयात राष्ट्रध्वज का फडकावला नाही असा प्रश्न त्यांना या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर मोहन भागवत यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

"लोकांनी आम्हाला हा प्रश्न विचारू नये. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला आम्ही जिथे असतो तिथे राष्ट्रध्वज फडकवतो. नागपुरातील महाल आणि रेशीम बाग या दोन्ही कॅम्पसमध्ये ध्वजारोहण होते. जिथे देशाच्या सन्मानाचा प्रश्न असतो, राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा प्रश्न असतो, तिथे लढा देण्यासाठी, प्राण पणाला लावण्यासाठी आम्ही तुम्हाला आघाडीवर दिसू," असे ते म्हणाले.

मोहन भागवत यांनी यावेळी 1933 मध्ये जळगावजवळ घडलेला एक किस्सा सांगितला. तेव्हा काँग्रेसच्या तेजपूर अधिवेशना दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू 80 फूट उंच खांबावर ध्वज फडकवत होते. त्याच वेळी झेंडा खांबाच्या मधोमध अडकल्याची घटना घडली. दरम्यान सुमारे दहा हजारांच्या गर्दीतून एक तरुण पुढे आला आणि खांबावर चढून त्याने अडकलेला ध्वज बाहेर काढला.

भागवतांच्या म्हणण्यानुसार, नेहरूंनी त्या तरुणाला अभिनंदनसाठी दुसऱ्या दिवशी परिषदेला येण्यास सांगितले पण तसे झाले नाही. कारण काही लोकांनी नेहरूंना सांगितले की तो तरुण संघाच्या शाखेत जातो. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना याची माहिती मिळताच त्यांनी त्या तरुणाच्या घरी जाऊन त्यांचे कौतुक केले आणि या तरुणाचे नाव किशनसिंग राजपूत असल्याचा दावा सरसंघचालकांनी केला.

भागवत पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रध्वजाच्या सन्मानाशी संबंध आहे, तेव्हापासून ही समस्या पहिल्यांदा निर्माण झाली होती. या दोन दिवशी (15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी) आपण राष्ट्रध्वजही फडकवतो. तसेच, राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याची वेळ येते, तेव्हा आपले स्वयंसेवक सर्वात पुढे असतात आणि आपल्या प्राणांची आहुती देण्यास ते तयार असतात. याशिवाय, आरक्षणाच्या मुद्द्यावर मोहन भागवत म्हणाले की, जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे.

 

 

Web Title: RSS chief Mohan Bhagwat says Our People are always ahead to sacrifice life for India and respected Indian flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.