RSS alert regarding Ayodhya results | अयोध्या निकालासंदर्भात संघाचा ‘दक्ष’ पवित्रा
अयोध्या निकालासंदर्भात संघाचा ‘दक्ष’ पवित्रा

ठळक मुद्देसामाजिक सौहार्द जपण्यासाठी नियोजन परिवारामधील देशभरातील संघटनांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालय लवकरच अंतिम निर्णय देणार आहे. यानंतर देशातील वातावरण खराब होऊ नये व सामाजिक सौहार्द जपला जावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशभरात शांतता राहावी यासाठी संघाने नियोजन केले असून यासंदर्भात रचनादेखील उभी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे निर्णय हिंदूंच्या बाजूने आला तर जल्लोषावर नियंत्रण ठेवण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादप्रकरणाची सुनावणी नुकतीच संपवली. सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार असल्याने त्याआधी या प्रकरणाचा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रचारक वर्गाची हरिद्वार येथील नियोजित बैठक दिल्ली येथे घेण्याचा निर्णय घेतला. राममंदिरप्रकरणी न्यायालयाचा निर्णय काहीही आला तरी जनतेने त्याचा स्वीकार करावा, निर्णयानंतर देशात सौहार्दपूर्ण वातावरण ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे आवाहन संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी ‘टिष्ट्वटर’च्या माध्यमातून केले.
दुसरीकडे अगदी दिल्लीपासून ते शाखापातळीपर्यंत संघाने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. संघ परिवारातील विविध संघटनांची यासंदर्भात बैठकदेखील झाली आहे. निकाल काहीही आला तरी त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटणार नाही. तसेच हिंदूंच्या बाजूने सकारात्मक निकाल आला तर जल्लोष हा नियंत्रित असावा याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. सोबतच संवेदनशील भागांमध्ये सामाजिक बंधूभाव कामय राहावा यासाठी संवाद-संपर्कावर भर देण्यात यावा, असे निर्देशदेखील देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘सोशल मीडिया’वर जपून व्यक्त व्हा
बजरंग दल, विहिंपकडून अनेकदा तीव्र प्रतिक्रिया देण्यात येतात. मात्र या प्रकरणाच्या निर्णयानंतर देशातील वातावरण संतुलित ठेवण्यासाठी या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील कार्यकर्त्यांसाठी सूचना जारी केली आहे. जर हिंदू समाजाच्या बाजूने निर्णय आला तर उत्साह मर्यादेबाहेर जाता कामा नये. हा निर्णय कुणाचा जय-पराजय याचा नसून इतिहासातील सत्यता स्वीकारण्याचा राहणार आहे. त्यामुळे कुठल्याही कार्यकर्ता- पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधू नये. ‘सोशल मीडिया’वर जपून व्यक्त व्हावे, नकारात्मक, उत्तेजनात्मक ‘पोस्ट’ करू नये. इतरांच्या अशा ‘पोस्ट’ला ‘लाईक’ किंवा ‘शेअर’ करू नये, असे बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक सोहन सोलंकी यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: RSS alert regarding Ayodhya results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.