नागपुरात ४१.८५ लाखांची सुपारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 01:07 IST2018-09-15T01:04:31+5:302018-09-15T01:07:08+5:30
वाडी पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीच्या आधारे वडधामना, अमरावती रोड येथील ए.व्ही.जी. लॉजिस्टिक पार्क लिमिटेड या कंपनीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून ४१.८५ लाख रुपयांची कमी दर्जाची सुपारी जप्त केली.

नागपुरात ४१.८५ लाखांची सुपारी जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाडी पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीच्या आधारे वडधामना, अमरावती रोड येथील ए.व्ही.जी. लॉजिस्टिक पार्क लिमिटेड या कंपनीवर अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून ४१.८५ लाख रुपयांची कमी दर्जाची सुपारी जप्त केली.
दत्तवाडी, साई मंदिरजवळील रहिवासी विजय हरीशचंद्र शुक्ला (३७) हे कंपनीचे मालक आहेत. त्यांच्याकडे १६,१०० किलो सुपारी विक्रीसाठी साठविल्याचे आढळून आले. या साठ्यातून एक नमुना विश्लेषणास्तव घेण्यात आला असून उर्वरित ४१,८५,४८० रुपये किमतीचा १६,०९८ किलो सुपारीचा साठा सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींनुसार कमी दर्जा आणि असुरक्षित असल्याच्या संशयावरून जप्त केला. पुढील आदेशापर्यंत अन्न व्यवसाय चालकाच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) शरद कोलते यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी स्मिता बाभरे व मनोज तिवारी तसेच वाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेंद्र बोराटे यांनी संयुक्तरीत्या केली. जनआरोग्याचा विचार करता या प्रकारची धडक मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. गुटखा, पानमसाला, सुगंधित व स्वादिष्ट तंबाखू, सुगंधित व स्वादिष्ट सुपारी व खर्रा इत्यादी प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन, वितरण, साठवण व विक्री होत असल्याचे आढळल्यास त्याबाबत नागरिकांना कार्यालयात माहिती देता येईल. जनतेने विशेषत: युवा वर्गाने अशा पदार्थांचे सेवन करू नये, असे आवाहन केकरे यांनी केले आहे.