The rope of cradle became death | पाळण्याची दोरी ठरली त्याच्यासाठी काळ ठरली

पाळण्याची दोरी ठरली त्याच्यासाठी काळ ठरली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाळण्याची दोरी बाळाला जोजविण्यासाठी असली तरी हीच दोरी एका आठ वर्षाच्या बालकासाठी काळ ठरली. हा दोर त्याच्या गळ्यात अडकल्याने फास बसला व त्याचा मृत्यू झाला. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगोत्री ले-आऊटमध्ये घडली. हर्ष विलास सांगोळे असे मृत बाळाचे नाव असून एका महिन्यातील अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे.
गंगोत्री ले-आऊटमध्ये राहणारे विलास सांगोळे हे एका खासगी फर्ममध्ये काम करतात. रविवारी दुपारी ४.३० वाजता घटना घडली तेव्हा विलासची पत्नी आणि आई घरीच होते. आठ वर्षाचा हर्ष दोरीच्या पाळण्यावर झुलत होता. विलासची पत्नी घरकामात व्यस्त होती. या दरम्यान त्याच्या गळ्यात फास बसला असावा, त्यामुळे तो बचावासाठी ओरडू शकला नसावा, अशी शक्यता आहे. याच दरम्यान, विलासच्या पत्नीचे त्याकडे लक्ष गेले. तिने धाव घेऊन मुलाच्या गळातील फास दूर केला. शेजाऱ्यांच्या मदतीने वानाडोंगरीमधील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरू आहे.
पाळण्याच्या दोरीमुळे जीव गमवावा लागल्याची ही नागपुरातील गेल्या महिनाभरातील तिसरी घटना आहे. लॉकडाऊनमुळे मुलांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. मोबाईल किंवा इनडोर गेम्स हेच त्यांच्यासाठी मनोरंजनाचे साधन आहे. यामुळे मुलेही कंटाळली आहेत. म्हणून खेळण्यासाठी नवनवे उद्योग मुले करीत असतात. अनेक घरांमध्ये नायलॉन दोर किंवा कपडे सुकविण्यासाठी दोर बांधलेला असतो. त्यावर बसून मुले खेळतात. त्यातून अशा घटना घडत आहेत. वारंवार अशा घटना घडत असल्याने पालकांनी मुलांना एकटे सोडू नये. पालकांनी वेळीच सावधान होण्याची गरज आहे.

Web Title: The rope of cradle became death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.