४६ लाखांचा गंडा घालणाऱ्या ठकबाज माडेवारला अटक; अनेकांना लावला चुना
By योगेश पांडे | Updated: September 10, 2022 12:12 IST2022-09-10T12:10:21+5:302022-09-10T12:12:19+5:30
भाजपचा पदाधिकारी असल्याचा बनाव

४६ लाखांचा गंडा घालणाऱ्या ठकबाज माडेवारला अटक; अनेकांना लावला चुना
नागपूर : एका जाहिरात कंपनीच्या मालकाला ४६ लाखांचा गंडा घालणाऱ्या ठकबाजास बजाजनगर पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रोहित माडेवार (हुडकेश्वर) असे आरोपीचे नाव असून, तो भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष असल्याचा दावा करतो. परंतु भाजपच्या नेत्यांनी तो दावा खोडून काढला आहे.
रोहित हा स्वत:ला मोठा समाजसेवक असल्याचे सांगतो. तसेच तो रोटी फाउंडेशन नावाची संस्था चालवितो. दिनेश मारशेट्टीवार यांना फ्लॅटसाठी कर्ज हवे होते. त्यांची माडेवारशी ओळख झाली व आपली बँकेतील बड्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून चार कोटी ५० लाखांचे गृहकर्ज एका झटक्यात मंजूर करण्याच्या बाता माडेवारने मारल्या. मारशेट्टीवार यांच्याकडून त्याने स्टॅम्प ड्यूटी आणि इतर खर्चासाठी १४ लाख रुपये घेतले.
यानंतर त्याने ४.५० कोटींचे गृहकर्ज मंजूर झाल्याचा मूळ डीडी देण्याऐवजी झेरॉक्स स्वरूपात दिला. तसेच रजिस्ट्री झाल्यानंतर ती बँकेत जमा करावी लागेल, त्यानंतर आपल्याला मूळ डीडी मिळणार असल्याची थाप मारली. एवढेच नव्हे तर विश्वास बसावा, यासाठी तो त्यांना दोन वकिलांकडे घेऊन गेला. त्यामुळे मारशेट्टीवार यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून एक नव्हे तर तीन फ्लॅटची रजिस्ट्री केली. याकरिता त्यांना ३२ लाखांची स्टॅम्प ड्यूटी भरावी लागली. त्यानंतर रजिस्ट्री घेऊन मारशेट्टीवार हे बँकेत पोहोचले. तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फेब्रुवारी महिन्यात त्यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता व तो अखेर दोन दिवसांअगोदर पोलिसांच्या हाती लागला. त्याला ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कन्नमवार, भाजपचे नाव वापरून फसवणूक
माडेवार याने भाजपचे नाव वापरून राज्यातील अनेक जणांना गंडा घातला आहे. बुधवारी बजाजनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंह राजपूत यांच्याकडे दोन जण आपबिती घेऊन पोहोचले. भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष असल्याचा तो दावा करायचा. शिवाय मोठमोठ्या ओळखी असल्याचे दाखवून समोरच्याला आपल्या बोलण्यात फसवायचा. इतकेच नव्हे तर माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचे नाव वापरूनदेखील तो आपले काम काढून घ्यायचा. त्याच्याकडे भाजपने भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडीचा प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. मात्र त्याचे प्रताप कळल्यावर त्याला पदावरून बाजूला केले होते.