११ एप्रिलपासून नदी स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:16+5:302021-04-09T04:08:16+5:30
महापौरांचे निर्देश : स्थायी समिती अध्यक्षांनी घेतला आढावा नागपूर : पावसाळ्यापूर्वी शहरातील नद्या आणि नाल्यांची स्वच्छता व्हावी, यासाठी ...

११ एप्रिलपासून नदी स्वच्छता अभियान
महापौरांचे निर्देश : स्थायी समिती अध्यक्षांनी घेतला आढावा
नागपूर : पावसाळ्यापूर्वी शहरातील नद्या आणि नाल्यांची स्वच्छता व्हावी, यासाठी ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नदी स्वच्छता अभियान सुरू होत आहे. लोकसहभागासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी ऑनलाईन बैठकीत दिले.
नदी स्वच्छता अभियानाचा आढावा घेण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी गुरुवारी ऑनलाईन बैठक घेतली. सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी आदी उपस्थित होते.
पावसाळ्यापूर्वी नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी व नाल्यांचीही सफाई करण्यात येते. त्या अनुषंगाने भोयर यांनी संपूर्ण तयारीचा झोननिहाय आढावा घेतला. नदी स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या पोकलॅण्ड, जेसीबी आणि अन्य मशीनरीजच्या तयारीसंदर्भात सर्व सहायक आयुक्तांनी माहिती सादर केली. नदीच्या प्रभाव क्षेत्रात (कॅचमेंट झोन) वृक्षारोपण करण्याच्या दृष्टीने जागा निश्चित करण्यासही अधिकाऱ्यांना निर्देश दिले. वेकोलि, मॉईल यासारख्या विभागाशी व संस्थांशी संपर्क साधून लोकसहभाग वाढवावा, असेही निर्देश महापौरांनी दिले.
११ एप्रिलला नाग नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ अशोक चौक येथील नाग नदी पात्रातून होईल. पिवळी नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ नारा घाट येथून तर पोहरा नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सहकारनगर घाटाजवळील नदीपात्रातून होणार आहे.