वायू प्रदूषणामुळे महानगरांना ‘लंग कॅन्सर’चा धोका अधिक; श्वसनमार्गाच्या वरच्या टप्प्यातील अवयवांमध्ये कर्करोग
By सुमेध वाघमार | Updated: February 15, 2024 20:04 IST2024-02-15T20:03:53+5:302024-02-15T20:04:13+5:30
कर्करोगामुळे होणारे जगातील सर्वाधिक मृत्यू हे फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होत असल्याचे पुढे आले आहे.

वायू प्रदूषणामुळे महानगरांना ‘लंग कॅन्सर’चा धोका अधिक; श्वसनमार्गाच्या वरच्या टप्प्यातील अवयवांमध्ये कर्करोग
नागपूर: कर्करोगामुळे होणारे जगातील सर्वाधिक मृत्यू हे फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होत असल्याचे पुढे आले आहे. फुफ्फुसाचा कर्करोग हा ब्रेस्ट’ आणि ‘प्रोस्टेट’ कर्करोगानंतरचा तिसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. वायू प्रदूषणामुळे महानगरांना ‘लंग कॅन्सर’चा धोका अधिक बळावला आहे. नाकातून प्रदूषित हवा शरीरात प्रवेश करीत असल्याने श्वसनमार्गाच्या वरच्या टप्प्यातील अवयवांमध्ये या कर्करोगाचा धोका अधिक असतो, अशी माहिती वरिष्ठ श्वसनरोग तज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी दिली.
-७७ टक्क्यांने कर्करोग वाढण्याची शक्यता
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) वायु प्रदूषणामुळे दरवर्षी जवळपास १८ लाख लोकांचा फुफ्फुसाचा कर्करोगाने मृत्यू होतो. दवसेंदिवस प्रदूषणाची पातळी वाढत असल्याने याकर्क रोगाचा धोकाही वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोगावर संशोधन करणाºया संघटनेने तंबाखू, लठ्ठपणा, मद्यपानासह वायू प्रदूषण हे देखील कर्करोगाच्यावाढीस प्रमुख घटक असल्याचे नमूद केले आहे. २०५०मध्ये सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या नवीन रुग्णांची संख्या ३५ दशलक्षांपेक्षा जास्त होईल असेही, अभ्यासातून मांडले आहे. ही आकडेवारी २०२२ मधील आकडेवारीपेक्षा ७७ टक्के जास्त असून धोक्याची घंटा आहे.
-यामुळे वाढतो फुफ्फुसाचा कर्करोग
पोलिसायक्लिक अरोम्यॅटिक हायड्रोकार्बन, कार्बन डायआॅक्साईड, नायट्रोजन डायआॅक्साईड आणि जड धातूंसारख्या कार्सिनोजेन्ससह विशिष्ट वायु प्रदूषकांच्या दीर्घकाळपर्यंत संपकार्मुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो, असेही डॉ. अरबट यांनी नमूद केले. हवेतील १० मायक्रोमिटरचे धूलिकण फुफ्फुसांमध्ये खोलवर प्रवेश करतात. अशा धूलिकणांशी दीर्घकाळ संपर्क व वाहन प्रदूषणातून उत्सर्जित होणारे संयुगे देखील फुफ्फुसाच्या कर्करोगास कारणीभूत ठरतात. ओझोनमुळे पृथ्वीतलावर होणारे वायूप्रदूषण हा देखील फुफ्फुसाच्या वाढत्या कर्करोगामागील महत्वाचे कारण आहे.
- हे घटकही जबाबदारी
महामार्गाजवळील शहरे, झपाट्याने विकसित होत असलेली महानगरे व त्यामुळे होणारे प्रदूषण आणि कारखान्यांसारख्या प्रदूषित वातावरणात काम करणाºया लोकांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका अधिक संभवतो. वायू प्रदूषणासोबतच तंबाखूचे दीर्घकालीन धूम्रपान, इंधन आणि कोळसा ज्वलनातून उत्सर्जित होणारा वायू आणि अनुवांशिकता हे घटक देखील फुफ्फुसाचा कर्करोगाला कारणीभूत ठरतात. परंतु, हवेतील प्रदूषित सुक्ष्म कण फुफ्फुसातील ट्युमरच्या विकासास प्रोत्साहन देतात. त्यामुळे वायू प्रदूषण रोखणे आणि त्यापासून आपला बचाव करणे काळाची गरज असल्याचे डॉ. अरबट म्हणाले.
-ही घ्या काळजी
- महिना-दोन महिन्यापासून खोकला, श्वास घेण्यास त्रास वा दम लागत असल्यास त्वरित पल्मनरी फंक्शन टेस्ट करा.
- एक्स-रे, ब्रोन्कोस्कोपीसारख्या श्वसनारोग्यासंबंधित चाचण्या वेळीच करून घ्या.
- लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या
- पालापाचोळा किंवा प्लास्टिक आणि आवारातील कचरा जाळू नका.
- सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा.
- वृक्ष लागवड करून प्राणवायूचे प्रमाण वाढवा.