समाजकल्याणच्या निवृत्त अधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 00:04 IST2020-10-27T00:02:52+5:302020-10-27T00:04:51+5:30
Revolver stolen case, crime news, Nagpur समाजकल्याण विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर आणि मोबाईल चोरट्याने लंपास केले. सोमवारी भल्या सकाळी ही घरफोडीची घटना घडली.

समाजकल्याणच्या निवृत्त अधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजकल्याण विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर आणि मोबाईल चोरट्याने लंपास केले. सोमवारी भल्या सकाळी ही घरफोडीची घटना घडली.
ध्रुव पिसारामजी आटे (वय ७१) असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. ते समाजकल्याण विभागाचे निवृत्त उपायुक्त असून, हिंगणा टी-पॉईंटवर राहतात. सोमवारी सकाळी ५.४५ ला ते नेहमीप्रमाणे घरासमोरच्या रस्त्यावर फिरायला गेले. जाताना त्यांनी घराच्या दाराला कुलूप लावल्याचे टाळले. अर्ध्या तासानंतर ते फिरून परत आले. त्यांनी जाताना डायनिंग टेबलवर मोबाईल चार्जिंगला लावून ठेवला होता. घरात शिरताच मोबाईल आढळला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे त्यांनी घरातील कपाट बघितले असता त्यात ठेवलेले रिव्हॉल्व्हर, सहा जिवंत काडतूस आणि महत्त्वाची कागदपत्रेही चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रतापनगर पोलिसांना माहिती कळविली. ठाणेदार भीमराव खंदाळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. चौकशीनंतर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रिव्हॉल्व्हर घेतले, सीसीटीव्ही नाही
आटे यांनी सुरक्षेसाठी रिव्हॉल्व्हर तसेच घरात महागड्या चेजवस्तू घेतल्या. आज चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या घरासमोर सीसीटीव्ही असेल म्हणून इकडेतिकडे तपासणी केली. परंतु सीसीटीव्ही आढळले नाही. आटे यांच्या मोबाईलच्या लोकेशनचा धागा धरून पोलिसांनी चोरट्याचा छडा लावण्याचे प्रयत्न चालविले आहेत.