लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उद्धवसेनेला संजय राऊत यांच्यामुळे फटका बसत असल्याचा चिमटा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला. नागपुरात ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत दररोज बोलतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं, हे सर्वांना माहिती आहे. ते कमी बोलले असते तर उद्धव ठाकरे यांच्या जागा वाढल्या असत्या. मात्र सततच्या बोलण्याने त्यांच्या जागा कमी होत आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षात कोणाला नेता मानायचे हे ठरविले पाहिजे. त्यांना भाजप आणि आमच्या राष्ट्रीय नेतृत्वामध्ये लुडबुड करण्याचा अधिकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थ व सक्षम आहेत. यापूर्वी अनेकांनी ८१-८२ वयापर्यंत काम केले आहे. ते २०२९ पर्यंत आमचे पंतप्रधान आहेतच. संजय राऊत यांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बद्दल ईर्ष्या आहे. कारण यांची सर्व दुकाने त्यांच्यामुळे बंद झाली आहे. सभागृहात दाखविण्यात आलेला पेन ड्राईव्हमध्ये भाजप नेत्यांची नावे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मात्र त्या सर्व शिळ्या भाकऱ्या आहे. मीडियामध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ते बोलत असतात. त्यांनी २०२५ बाबत बोलले पाहिजे. विरोध करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे मात्र, महाराष्ट्राच्या विकासासाठी चार गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगावे, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.
कोकाटेंबाबत सावध प्रतिक्रियाकृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत बावनकुळे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. माणिकराव कोकाटे यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीनंतर सर्व समोर येईल असे मत व्यक्त केले होते. आता कोकाटे स्वतः त्या संदर्भात बोलले आहे. त्यामुळे त्या विषयावर काही बोलणे योग्य ठरणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.