प्रियकराच्या मदतीने पतीला संपवण्याचा डाव उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:26 IST2020-12-04T04:26:04+5:302020-12-04T04:26:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी विवाहितेने प्रियकराच्या मदतीने पतीवर प्राणघातक हल्ला चढवला. ...

प्रियकराच्या मदतीने पतीला संपवण्याचा डाव उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी विवाहितेने प्रियकराच्या मदतीने पतीवर प्राणघातक हल्ला चढवला. पोलीस तपासात हे धक्कादायक वास्तव उघड झाल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी राजश्री डेकाटे (वय २६)आणि तिचा प्रियकर रजत शामराव सोमकुंवर (वय २८) या दोघांना अटक केली.
राजश्रीचे माहेर धापेवाड्यातील आहे. बाजूच्या नायगावला आरोपी रजत राहतो. त्यांच्यात सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांचे लग्न होऊ शकले नाही. राजश्रीचे राकेश डेकाटेसोबत लग्न झाले. त्यांना एक मुलगाही आहे. असे असतानादेखिल राजश्री आणि रजतमधील माधुर्य तसेच होते. त्यांच्या संबंधात राकेश अडसर ठरला होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी हे दोघे अनेक दिवसांपासून कटकारस्थान करत होते. मंगळवारी राकेश, पत्नी आणि मुलाला घेऊन सासरी गेला होता. रात्री परत येत असताना ७.३० च्या सुमारास गोरेवाडा पारिसरात एका आरोपीने राकेशवर प्राणघातक हल्ला चढवला आणि पसार झाला. रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी लगेच धाव घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या राकेशला लगेच वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत झाली. त्यामुळे राकेशचा जीव वाचला.
मोबाईल बोलला
गिट्टीखदान पोलिसांनी या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर तपास सुरू केला. तपासात राजश्री विसंगत माहिती देत असल्याने तिच्यावरचा संशय वाढला.
तिच्या मोबाईलमध्ये घटनेच्या काही वेळेपूर्वीपासून एका विशिष्ट नंबरशी वारंवार संपर्क झाल्याने पोलिसांनी तो नंबर तपासला असता एका युवकाचा निघाला. घटनेच्या वेळी आरोपी रजतने तो मोबाईल वापरल्याचे पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बोलते केले असता त्याने राकेशवर चाकू हल्ला केल्याची कबुली देतानाच राजश्रीचाही या गुन्ह्याच्या कटात सहभाग असल्याचे सांगितले. तिनेही पोलिसांना तशी कबुली दिली.
---
गावातूनच सुरू केला पाठलाग
आरोपी रजत राकेशच्या मागावर गावापासूनच होता. घटनास्थळी अंधार असल्याचे पाहून तिने मुलाला उलटी आल्याचे सांगून राकेशला दुचाकी थांबविण्यास बाध्य केले आणि त्याचवेळी रजतने राकेशवर चाकूहल्ला करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच मदत मिळाल्याने राकेश बचावला. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली गिट्टीखदानचे पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वात पीएसआय साजिद अहमद हवलदार युवराज ढोले, नायक ईशांत हाटे, आशिष बावणकर, संतोष शेंदरे, ईमरान आणि विक्रम ठाकूर यांनी ३६ तासातच या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक केली.
---