निवृत्तिवेतनधारकांना अद्याप कोणतीही मदत नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:26 IST2020-06-19T21:25:17+5:302020-06-19T21:26:45+5:30
बऱ्याच काळापासून ईपीएस ९५च्या निवृत्त वेतनधारकांना पेन्शनमध्ये वाढ करवून देण्याच्या मागणीचा वाद सुरू आहे. मात्र, तो वाद निवळण्याऐवजी चिघळतच चालल्याचे दिसून येते.

निवृत्तिवेतनधारकांना अद्याप कोणतीही मदत नाही!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बऱ्याच काळापासून ईपीएस ९५च्या निवृत्त वेतनधारकांना पेन्शनमध्ये वाढ करवून देण्याच्या मागणीचा वाद सुरू आहे. मात्र, तो वाद निवळण्याऐवजी चिघळतच चालल्याचे दिसून येते. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील ६५ लाख निवृत्तिवेतनधारकांना ९७३ कोटी रुपयाची मदत केल्याचा दावा निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीचे राष्ट्रीय महासचिव प्रकाश पाठक यांनी फेटाळून लावला आहे.
सप्टेंबर २०१४च्या अर्थसंकल्पात या निवृत्तिवेतनधारकांना पेन्शनपोटी ८६८ कोटी रुपयांचे नियोजन करण्यात येऊन दरमहा तीन हजार रुपये अंतरिम मदत म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, ही योजना स्थगित करून केवळ एक हजार रुपयेच गेल्या सहा वर्षापासून देण्यात येत आहेत. त्यातच कोविड-१९च्या काळात सरकारकडून वेतनधारकांविषयी संवेदनेची अपेक्षा होती. ती पूर्ण न करता ९७३ कोटी रुपयाची मदत केल्याची घोषणा करत वेतनधारकांसोबत क्र्रूर चेष्टा केली जात असल्याचा आरोप प्रकाश पाठक यांनी केला आहे. याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.