स्कूटीसह २० फूट खड्ड्यात पडल्याने निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू, मोबाईल लोकेशनच्या आधाराने लागला शोध
By जितेंद्र ढवळे | Updated: January 20, 2023 03:15 IST2023-01-20T03:14:06+5:302023-01-20T03:15:23+5:30
इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचे सेवानिवृत्त अधिकारी पांचू भट्टाचार्य यांची कोंढाळी नजीक बिहालगोंदी शिवारात शेती आहे.

स्कूटीसह २० फूट खड्ड्यात पडल्याने निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू, मोबाईल लोकेशनच्या आधाराने लागला शोध
कोंढाळी : कोंढाळी पोलिस ठाण्याअंतर्गत चाकडोह शिवारात अनियंत्रित स्कूटीसह २० फूट खड्ड्यात घसरल्याने स्कूटी चालक वृद्धाचा मृत्यू झाला. पांचू गोपाल भट्टाचार्य (वय ६४, रा. भूपेश नगर, नागपूर, असे मृताचे नाव आहे.
इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचे सेवानिवृत्त अधिकारी पांचू भट्टाचार्य यांची कोंढाळी नजीक बिहालगोंदी शिवारात शेती आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पांचू भटाचार्य हे शेतीवर येण्यासाठी स्कूटी (एम.एच.३१-एफ.व्ही.९०५५)ने नागपूर येथून निघाले. मार्गात डिफेन्स गेटनजवळ त्यांची मित्र बबन काटोले (६३, रा. नागपूर) यांच्याशी भेट झाली. काटोलेसुद्धा इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचे कर्मचारी आहेत. त्यांची शेती पांचू यांच्या शेताशेजारीच बिहालगोंदी शिवारात आहे. ते मोटारसायकलने नागपूरकडून शेताकडे जात. बबन काटोले पुढे, तर पांचू भट्टाचार्य मागे होते. बबन काटोले शेतात पोहोचले, पण पांचू भट्टाचार्य सायंकाळपर्यंत शेतात आले नाही. त्यांच्या मोबाईलवर वारंवार कॉल करूनही ते फोन उचलत नव्हते. त्यामुळे याबाबतची माहिती सायंकाळी सहा वाजता कोंढाळी पोलिसांना देण्यात आली. कोंढाळीचे ठाणेदार पंकज वाघोडे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल भोजराज तांदूळकर, किशोर लोही, दशरथ पवार, मंगेश धारपुरे, आदींनी मोबाईल लोकेशनच्या आधारे भट्टचार्य यांचा शोध सुरू केला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोंढाळीपासून १० कि.मी अंतरावर रोडपासून २० फूट खाली एका खड्ड्यात स्कूटीसह भट्टाचार्य यांचा मृतदेह आढळून आला.
भट्टाचार्य यांनी हेल्मेट घातले होते, पण तो लॉक नसल्याने स्कूटीसह खड्ड्यात पडल्याने डोके एका मोठ्या दगडावर आदळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. पण, दाट झाडी झुडूप असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना ते दिसत नव्हते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांची स्कूटी चालू होती. त्यांच्याकडे रोख रक्कम व मोबाईल होता. कोंढाळी पोलिसांनी मृतदेह विच्छेदनाकरिता काटोल ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.