Retired bank officer cheated by 86 thousand in Nagpur | नागपुरात  निवृत्त बँक अधिकाऱ्याचे ८६ हजार लंपास 
नागपुरात  निवृत्त बँक अधिकाऱ्याचे ८६ हजार लंपास 

ठळक मुद्देऑनलाईन चिटिंग : अंबाझरीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अ‍ॅमेझोनमधून बोलतो, असे सांगून सायबर गुन्हेगाराने एका निवृत्त बँक अधिकाऱ्याच्या खात्यातून ८६ हजार रुपये लंपास केले. ११ जुलैला सकाळी झालेली ही बनवाबनवी उशिरा लक्षात आल्यानंतर, दिनेश वसंतराव रत्नपारखी (वय ६१) यांनी शुक्रवारी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली.
रत्नपारखी रामनगरात राहतात. ते दोन वर्षांपूर्वीपर्यंत बँकेत सेवारत होते. ११ जुलैला सकाळी ७.३० वाजता त्यांना एक फोन आला. मी अ‍ॅमेझोनमधून बोलतो, असे सांगून सायबर गुन्हेगाराने त्यांना वेगवेगळ्या योजना सांगून त्यात कसा फायदा आहे, त्याची माहिती दिली. त्यानंतर रत्नपारखी यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन व्हीपीआयमार्फत त्यांच्या खात्यातून ८५,९०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. या गैरप्रकाराबाबत अनभिज्ञ असलेल्या रत्नपारखी यांनी अलीकडे बँकेत व्यवहार केला असता, त्यांच्या खात्यात त्यांना ८५,९०० रुपये कमी असल्याचे लक्षात आले. त्यांनी विचारपूस केली असता, ११ जुलैला त्यांच्या खात्यातून ही रक्कम वळती करून घेण्यात आल्याची माहिती उजेडात आली. रत्नपारखी यांनी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Retired bank officer cheated by 86 thousand in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.