पुन्हा बदल्यांचे वेध

By Admin | Updated: May 11, 2014 01:25 IST2014-05-11T01:25:12+5:302014-05-11T01:25:12+5:30

लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात खुद्द जिल्हाधिकार्‍यांसह अनेक उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर आता मतमोजणी आटोपल्यावर मे महिना ...

Repeat transit | पुन्हा बदल्यांचे वेध

पुन्हा बदल्यांचे वेध

नागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात खुद्द जिल्हाधिकार्‍यांसह अनेक उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर आता मतमोजणी आटोपल्यावर मे महिना अखेरीस आणखी तीन ते चार उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या अपेक्षित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात तीन वर्षापेक्षा जास्त काळ एकाच जिल्ह्यात घालवणार्‍या अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. नायब तहसीलदारापासून तर उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकार्‍यापर्यंतच्या अधिकार्‍यांचा त्यात समावेश होता. उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रदीप डांगे यांचीही बदली झाली होती. मात्र त्यांना थांबवून ठेवण्यात आले. त्यानंतर मधल्या काळात म्हणजे निवडणुकीपूर्वीच निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्याही बदलीची चर्चा होती. मात्र नंतर त्याला पूर्णविराम मिळाला. आता पुन्हा दुसर्‍या टप्प्यातील बदल्यांची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वर्तुळात जोरात आहे. निवडणुकीपूर्वी ज्यांच्या बदल्या झाल्या नाही व जे बदलीस पात्र आहेत अशा काही उपजिल्हाधिकार्‍यांची नावे चर्चेत आहेत. जिल्ह्यात तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या उपजिल्हाधिकार्‍यांमध्ये आशा पठाण, प्रकाश पाटील, प्रदीप डांगे यांचा समावेश आहे. निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांची थांबलेली बदली पुन्हा होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेची (पदवीधर मतदार संघ) व त्यानंतर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्याची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रशासकीय फेरबदल अपेक्षित आहे. सध्या प्रशासन १६ मे रोजी असलेल्या मतमोजणीच्या कामात व्यस्त आहे. ही प्रक्रिया आटोपल्यानंतर किंवा मे महिन्याच्या अखेरपर्यंत बदल्यांचे आदेश निघण्याची शक्यता आहे. दरम्यान नायब तहसीलदारांना तहसीलदार म्हणून पदोन्नती देण्याच्या प्रलंबित प्रस्तावांवरही या महिन्यात निर्णय लागण्याची शक्यता आहे. ( प्रतिनिधी)

Web Title: Repeat transit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.