२०२३ ची पुनरावृत्ती? अंबाझरी तलाव फक्त २० सेंटीमीटरवर ओव्हरफ्लो!
By शुभांगी काळमेघ | Updated: July 10, 2025 17:08 IST2025-07-10T17:07:17+5:302025-07-10T17:08:28+5:30
पावसाचा कहर: तलाव ओसंडत आले, नागपूर पुन्हा पुराच्या छायेत

Repeat of 2023? Ambazari lake overflows by just 20 centimeters!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात सलग काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी आणि गोरेंवाडा तलावांची पातळी धोक्याच्या सीमेजवळ पोहोचली आहे. त्यामुळे २०२३ मधील अचानक आलेल्या महापुराची आठवण नागपूरकरांच्या मनात पुन्हा जागी झाली आहे. गेल्या २४ तासांत अंबाझरी तलावात १.८२ मीटरने पाण्याची पातळी वाढली असून, आता तो ओव्हरफ्लो होण्यासाठी फक्त २० सेंटीमीटर बाकी आहे. त्याचप्रमाणे गोरेंवाडा तलावाची पातळीही २.६८ मीटरवर पोहोचली असून, तीही ओव्हरफ्लोच्या अगदी जवळ आहे.
२०२३ च्या पुराच्या आठवणी ताज्या
२३ सप्टेंबर २०२३ रोजी अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला होता आणि त्यात नागपुरात भीषण पूर आला होता. त्या पुरामध्ये चार नागरिकांनी जीव गमावला होता तर ३०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले होते. तेव्हा पुरामुळे २५ पेक्षा अधिक वसाहती जलमय झाल्या होत्या. हजारो लोकांची घरे पाण्याखाली गेली होती.
अपूर्ण ड्रेनेज, खोदकाम आणि ढिसाळ नियोजनावरून चिंता
आता पुरामुळे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना जाहीर केल्या असल्या तरी अनेक कामे अद्यापही अपूर्ण आहेत. ड्रेनेज यंत्रणा कोलमडलेली आहे, रस्ते खोदकाम अजूनही अपूर्ण आहे, नाल्यांमध्ये गाळ आणि झाडे अडथळा बनत आहेत. काही ठिकाणी रिटेनिंग वॉल्सचे कामही सुरूच आहे, पण ते धीम्या गतीने चालू आहे. त्यामुळे पुराचा तडाखा सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
प्रशासन सज्ज पण नागपूरकर सतर्क
नागपूर महापालिकेने अतिसंवेदनशील भागात बॅरिकेड्स आणि चेतावणी फलक लावले आहेत. तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. अंबाझरी धरणाजवळ रु. ४.४ कोटींच्या खर्चाने 'एस्केप गेट्स' बसवण्याचे काम सुरू आहे. सध्या ८ किमीपेक्षा अधिक लांबीचे रिटेनिंग वॉल्स बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
तलावांची पातळी वाढत आहे त्यामुळे प्रशासन यंत्रणा सज्ज असली तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर कामे अपूर्ण आहेत, नाले कचऱ्याने भरलेले आहेत त्यामुळे नागरिकांमध्येचिंता आणि भीतीदायक वातावरण आहे. नागपूरला २०२३ चा इतिहास पुन्हा अनुभवावा लागू नये, यासाठी वेळेवर आणि प्रभावी निर्णयांची गरज आहे.