नागपूर : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार साेमवारी विदर्भात आषाढ सरींनी सर्वदूर जाेरदार हजेरी लावत माेठा दिलासा दिला आहे. नागपूर जिल्ह्यात सकाळपासून सुरू झालेली संततधार रात्रीपर्यंत थांबली नाही. दुसरीकडे चंद्रपूर, गडचिराेली, गाेंदिया जिल्ह्यात सकाळपर्यंत पावसाने चांगलेच धुमशान घातले. गाेंदियात दिवसा सुद्धा पाऊसधारा कायम हाेत्या. इतर जिल्ह्यातही दिलासादायक पाऊस झाला. जमिनीच्या संपूर्ण ओलाव्यासाठी शेतकऱ्यांना अशा पावसाची प्रतीक्षा हाेती.
रविवारी रात्री गाेंदिया जिल्ह्याला पावसाने सर्वाधिक झाेडपले. साेमवार सकाळपर्यंत शहरात सर्वाधिक ८५.८ मि.मी. पावसाची नाेंद झाली. हे सत्र दिवसाही सुरू हाेते व सायंकाळपर्यंत २६ मि.मी. पावसाची नाेंद झाली. या मुसळधार हजेरीने जिल्ह्यात नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. काही मार्गावर वाहतूकही खाेळंबल्याची माहिती आहे. याशिवाय चंद्रपूर शहरात सकाळपर्यंत ५१ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. गडचिराेली शहरात सकाळपर्यंत ४३ मि.मी. नाेंद झाली, तर जिल्ह्यातील धानाेरा सर्कलमध्ये ६२.९ मि.मी. पाऊस झाला. दाेन्ही जिल्ह्यात साेमवारी दिवसभर काही अपवाद वगळता पावसाने उसंत घेतली.
नागपूर जिल्ह्यात सकाळपासून सुरू झालेल्या आषाढसरींची संततधार रात्रीपर्यंत न थांबता अविरतपणे सुरू हाेती. सकाळपर्यंत १३ मि.मी. पावसाच्या नाेंदीनंतर सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ४७ मि.मी. पावसाची नाेंद झाली. ही संततधार रात्रीही कायम हाेती. सर्वदूर झालेला पाऊस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला.
विदर्भातील इतर जिल्ह्यातही पावसाच्या सरींनी चांगली हजेरी लावली. बुलढाण्यात सकाळपर्यंत २९.२, तर सायंकाळपर्यंत २३ मि.मी. पाऊस झाला. यवतमाळला सकाळपर्यंत २४ मि.मी. नाेंद झाली. अमरावतीत दिवसा १३ मि.मी. नाेंदीसह चांगल्या सरी बरसल्या. भंडारा, अकाेला व वाशिम जिल्ह्यातही पावसाची हजेरी समाधान देणारी ठरली.
पुढचे दाेन दिवसही मुसळधारहवामान विभागाच्या निरीक्षणानुसार विदर्भात पुढचे दाेन दिवस काही ठिकाणी अतिजाेरदार ते अत्याधिक जाेरदार पावसाची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिराेली, गाेंदिया, भंडारा व यवतमाळ जिल्ह्यात २४ तासात काही भागात अतिजाेरदार पाऊस हाेण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. अमरावती जिल्ह्यात ८ व ९ जुलै राेजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अकाेला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस हाेण्याची शक्यता आहे.