लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :रिलायन्स डिफेन्सने सोमवारी अमेरिकेच्या संरक्षण विभागातील एक अग्रगण्य कंत्राटदार कोस्टल मेकॅनिक्स इंकसोबत (सीएमआय) एक धोरणात्मक करार केला. या करारांतर्गत मिहानमध्ये २० हजार कोटी रुपयांचा देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल डेपो (एमआरओ) संयुक्तपणे स्थापन करण्यात येणार आहे.
एमआरओमध्ये जग्वार आणि मिग-२९ लढाऊ विमाने, अपाचे हेलिकॉप्टर, एल-७० हवाई संरक्षण तोफा आणि भारतीय सशस्त्र दलांशी संबंधित काही इतर उपकरणांची दुरुस्ती आणि देखभाल होईल. या प्रकल्पांमध्ये संबंधित उत्पादकांच्या सहकार्याने विमानांचे भाग आणि संरक्षण उपकरणांचे उत्पादनदेखील केले जाईल, असे रिलायन्स डिफेन्सने एका प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. ही भागीदारी भारत सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' उपक्रमांना पुढे नेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
संरक्षण उत्पादनाचे स्वदेशीकरण करणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा याचा उद्देश आहे. नागपूरमधील मिहान देशाचे विमान वाहतूक केंद्र बनत आहे. त्यात आधीच एअर इंडिया आणि इंदमार कंपन्यांचे देखभाल दुरुस्ती आणि ओव्हरहॉल डेपो (एमआरओ) आहेत आणि फाल्कन आणि राफेल विमानांचे भाग बनवणारे डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस चालवणारे प्रकल्प आहे. फ्रान्सचा थेल्स ग्रुप रडार आणि त्याचे घटक बनवतो.
गेल्या एका महिन्यात मिहानमध्ये तीन मोठे एव्हिएशन प्रकल्प जाहीर करण्यात आले. नवीनतम प्रकल्प म्हणजे रिलायन्स डिफेन्स आणि कोस्टल मेकॅनिक्सचा २० हजार कोटी रुपयांचा एमआरओ आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशनने मिहानमध्ये ८ हजार कोटी रुपयांचा हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला होता. त्यानंतर डसॉल्ट आणि रिलायन्सने त्यांच्या मिहान प्रकल्पांमध्ये फाल्कन बिझनेस जेट्स बनवण्याची घोषणा केली. या प्रकल्पाची किंमत सुमारे १० हजार कोटी रुपये आहे. या प्रकल्पात हजारो लोकांना रोजगार मिळत नसला तरी, ते शेकडो अभियंत्यांना उच्च पगाराच्या नोकऱ्या देतात. शिवाय, ते जागतिक नकाशावर नागपूरला स्थान देतील.