१९ वर्षांनंतर सुटका... पण ना नातेवाईक पोहोचले, ना मेहनताना मिळाला, एहेतेशाम सिद्दीकी व मोहम्मद शेख यांची सुटका
By योगेश पांडे | Updated: July 21, 2025 23:13 IST2025-07-21T22:42:41+5:302025-07-21T23:13:04+5:30
Nagpur News: मुंबईत ११ जुलै २००६ ला झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या दोन आरोपींची सोमवारी रात्री नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. १९ वर्षांनंतर दोघेही तुरुंगाबाहेर आले असले तरी त्यांना घ्यायला ना नातेवाईक पोहोचू शकले ना त्यांना कुठलाही मेहनताना मिळाला.

१९ वर्षांनंतर सुटका... पण ना नातेवाईक पोहोचले, ना मेहनताना मिळाला, एहेतेशाम सिद्दीकी व मोहम्मद शेख यांची सुटका
- योगेश पांडे
नागपूर - मुंबईत ११ जुलै २००६ ला झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या दोन आरोपींची सोमवारी रात्री नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. १९ वर्षांनंतर दोघेही तुरुंगाबाहेर आले असले तरी त्यांना घ्यायला ना नातेवाईक पोहोचू शकले ना त्यांना कुठलाही मेहनताना मिळाला. त्यामुळे त्यांच्याजवळ अगोदर असलेल्या काही हजार रुपये घेऊनच ते कारागृहातून एटीएसच्या पथकासह बाहेर पडले. त्यांना एटीएसच्या पथकाने गुप्त ठिकाणी पोहोचविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, तुरुंगात असताना दाखविलेला आक्रमकपणा व मुजोरीपूर्वक वागणुकीमुळे तिसरा कैदी नावेदचा मात्र मुक्काम कायम आहे. त्याच्याविरोधात तुरुंगात मारहाणीच्या दोन प्रकरणे सुरू आहेत.
एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी, मोहम्मद अली आलम शेर शेख व नावेद हुसैन राशिद हुसैन खान यांची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली. एहतेशामला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या तिघांनाही ३० सप्टेंबर २०१५ साली नागपूर मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. तेव्हापासून त्यांना अंडा सेलमध्येच ठेवण्यात आले होते. अंडा सेलमध्ये असल्याने त्यांना कारागृहातील कुठलेही काम देण्यात आले नव्हते. त्यामुळे सुटकेच्या वेळी त्यांना कुठलाही मेहनताना मिळाला नाही.
निर्णय ऐकताच डोळ्यात आनंदाश्रू
संबंधित प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान तिघेही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. निर्दोष सुटका झाल्याचे कळताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले व त्यांनी एकमेकांचे अगोदर अभिनंदन केले. सुटका होईल तेव्हा कुणी तरी घ्यायला येईल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र वेळेच्या अभावामुळे कुणीच पोहोचू शकले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
निर्दोष मुक्तता होऊनदेखील नावेद तुरुंगातच
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेशानंतर निर्दोष सुटका केलेला तिसरा आरोपी नावेद हुसैन राशिद हुसैन खान आणखी एका प्रकरणात आरोपी असल्याने कारागृहातच ठेवण्यात आले आहे. जळगाव येथील असलेल्या नावेदने नागपूर कारागृहात २०१९-२० मध्ये मारहाण केली होती. हे प्रकरण सध्या सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.
कडेकोट सुरक्षाव्यवस्था अन प्रसारमाध्यमांना गुंगारा
दरम्यान, एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी, मोहम्मद अली आलम शेर शेख या दोघांचीही सुटका होणार असल्याने प्रसारमाध्यमांची कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी झाली होती. पाच वाजताच्या सुमारास त्यांची सुटका होणे अपेक्षित होते. मात्र त्यांना कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत बाहेर काढण्यात आले. प्रसारमाध्यमांना गुंगारा देत त्यांना एटीएसच्या पथकाने दुसऱ्या मार्गाने बाहेर नेले.
चौथ्या आरोपीने कोरोनादरम्यान घेतला जगातून निरोप
या प्रकरणातील आणखी एक आरोपी कमाल अन्सारी हादेखील नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे २०२१ मध्ये त्याचा मृत्यू झाला.
एहतेशामला बसला होता धक्का
एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी याला दिल्ली उच्च न्यायालयाने २०२४ मध्ये धक्का दिला होता. १ जानेवारी २००६ ते ३० जून २००६ दरम्यान मुंबई विमानतळावरून हाँगकाँग किंवा चीनला जाणाऱ्या परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालय किंवा इमिग्रेशन कार्यालयात नोंदवलेल्या मोहम्मद आलम गुलाम साबीर कुरेशीच्या प्रस्थान आणि आगमनाबाबत सिद्दीकी यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितली होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने ती माहिती वैयक्तिक स्वरुपाची असल्याने निरीक्षण नोंदवत ती देण्यास नकार दिला होता. सिद्दीकीने त्याला बॉम्बस्फोटात नाहक गोवण्यात आल्याचा दावा केला होता.