नागपुरातील सायको किलरचे स्केच जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:24 IST2018-12-08T23:23:36+5:302018-12-08T23:24:27+5:30
पाच मिनिटात दोन महिलांवर चाकूहल्ला करून उपराजधानीत दहशत निर्माण करणाऱ्या सायको किलरचा शोध लावण्यासाठी त्याचे रेखाचित्र (स्केच) शहर पोलिसांनी जारी केले आहे. त्याच्या संबंधीची कसलीही माहिती असल्यास तातडीने पोलिसांना कळवा, असे आवाहन करून तुमचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

नागपुरातील सायको किलरचे स्केच जारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच मिनिटात दोन महिलांवर चाकूहल्ला करून उपराजधानीत दहशत निर्माण करणाऱ्या सायको किलरचा शोध लावण्यासाठी त्याचे रेखाचित्र (स्केच) शहर पोलिसांनी जारी केले आहे. त्याच्या संबंधीची कसलीही माहिती असल्यास तातडीने पोलिसांना कळवा, असे आवाहन करून तुमचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
दुचाकीवर येऊन महिलांना जखमी करणे आणि पळून जाणे, अशी सायको किलरची पद्धत असून त्याने अशा प्रकारे गेल्या वर्षी सहा महिलांना गंभीर जखमी केले होते. त्याच्या शोधार्थ पोलिसांनी मोहीम तीव्र केल्याचे पाहून तो भूमिगत झाला. त्याची भीती महिलांच्या मनातून गेली असतानाच शुक्रवारी अचानक तो सक्रिय झाला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने मॉर्निंग वॉकला निघालेल्या सविता श्रीकांत मानेकर यांना आणि नंतर सफाई कर्मचारी मालू सुरेश राऊत यांना चाकूने मारून जखमी केले आणि पळून गेला. सीसीटीव्हीत त्याचे व्यवस्थित चित्रण न आल्यामुळे पोलिसांनी जखमी महिलांचे बयान घेत त्याआधारे पोलिसांनी रेखाचित्र बनविले. ते जारी करून सायको किलरचा पोलिसांनी शोध घेणे सुरू केले आहे.