गुरुनुलेच्या साथीदाराचे नातेवाईक ६९ लाख घेवून ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 21:36 IST2020-11-27T21:34:41+5:302020-11-27T21:36:29+5:30
Gurunule's 69 lakh deposit in Police Station महाठग विजय रामदास गुरनुले आणि त्याच्या साथीदारांच्या बनवाबनवीचा बोभाटा झाल्यामुळे या सर्वांचे नातेवाईकही हादरले आहेत. आरोपींनी त्यांच्या नातेवाईकांना खोटीनाटी माहिती देऊन त्यांच्याकडे कोट्यवधी रुपये लपवून ठेवल्याचेही स्पष्ट झाले आहे.

गुरुनुलेच्या साथीदाराचे नातेवाईक ६९ लाख घेवून ठाण्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाठग विजय रामदास गुरनुले आणि त्याच्या साथीदारांच्या बनवाबनवीचा बोभाटा झाल्यामुळे या सर्वांचे नातेवाईकही हादरले आहेत. आरोपींनी त्यांच्या नातेवाईकांना खोटीनाटी माहिती देऊन त्यांच्याकडे कोट्यवधी रुपये लपवून ठेवल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आपल्यावरही पोलिसांच्या कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो, या भीतीपोटी गुरनुलेच्या साथीदारांच्या नातेवाईकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशाच एका अस्वस्थ नातेवाईकाने प्रतापनगर पोलिसांना गुरुवारी रात्री ६८.७९ लाख रुपये सोपवले. मध्य प्रदेशातील सौंसरमध्ये पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली.
गुरनुलेच्या मेट्रो विजन बिल्डकॉन इंडिया लिमिटेड, रियल ट्रेड आणि मेट्रो कॉईन या बोगस कंपन्यांच्या बनवाबनवीचे वृत्त लोकमतने लावून धरल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. प्रतापनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत मुख्य सूत्रधार विजय गुरनुले, जीवनदास दंडारे, रमेश बिसेन, अतुल मेश्राम, अविनाश महाडोले, राजू मोहरले, श्रीकांत निकुरे, ज्ञानेश्वर बावणे, देवेंद्र गजभिये, रोशन कडू आणि तन्मय जाधव या ११ आरोपींना पोलिसांनी अटक केली. ते सध्या पोलीस कस्टडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून नवनवीन माहिती पुढे येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीपैकी एक फरार असलेला आरोपी सुनील गजानन श्रीखंडे हा मध्य प्रदेशातील सौंसर (जि. छिंदवाडा) येथील रहिवासी आहे. पोलिसांनी इतर आरोपींसोबत त्याच्याही नातेवाईकांकडे चौकशी चालवली. या चौकशीतून पोलिसांना पुन्हा एकदा नोटांचे घबाड मिळाले. आरोपी सुनील श्रीखंडे याने आपण खूप मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असून या कंपनीला नियमित लाखोंचा फायदा होत असल्याची थाप मारुन त्याच्या भाऊ तसेच अन्य नातेवाईकांकडे लाखो रुपये सोपविले. यातील ६८ लाख, ७९ हजार, ४४० रुपये आरोपी श्रीखंडेच्या भावाने गुरुवारी रात्री नागपूर पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी ही रक्कम जप्त करून आज नागपुरात आणली.
दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अमरावती येथील गुरनुलेच्या एका नातेवाईकाकडून ४८ लाख, ४८ हजार तसेच मित्राकडून ७ लाख अशी एकूण ५५. ४८ लाखांची रोकड जप्त केली होती. या प्रकरणात आतापर्यंत जप्त केलेली रोकड १ कोटी, २४ लाख, २७ हजार, २४० रुपये, तर इतर मालमत्ता मिळून जप्तीची रक्कम १ कोटी, ७२ लाख, ६१ हजार, ८७२ रुपये झाली आहे.