लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने वॉटर पार्क अॅण्ड अम्युझमेंट पार्कवर लावलेला वस्तू व सेवा कर (जीएसटी) १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात यावा, अशी मागणी विदर्भ असोसिएशन ऑफ वॉटर अॅड अम्युझमेंट पार्कने केली आहे. संघटनेने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.
असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी सांगितले, पर्यटन क्षेत्र हे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती, विकास आणि आर्थिक वृद्धीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये वॉटर पार्क आणि मनोरंजन केंद्रांची विशेष भूमिका आहे. मात्र, सरकारने वॉटर पार्कवर १८ टक्के जीएसटी लादून पर्यटनाला कमजोर केले आहे. अवाढव्य जीएसटी दरामुळे हा उद्योग संकटात सापडला आहे. जीएसटीमुळे उद्योजक कमी दराचे तिकिटे ठेवू शकत नाही आणि पर्यटकांना हे दर परवडत नाही. महागड्या दरामुळे पर्यटकांचा अत्यल्प प्रतिसाद या स्थळांना मिळतो, ज्यामुळे उद्योजकांनाही तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी, रोजगार निर्मिती व पर्यटनवाढीला अडथळे निर्माण झाले आहेत.
विदर्भात पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी अनेक संधी आहेत. मात्र सरकारने याकडे सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. सरकारने सर्वात आधी वॉटर पार्कवरील जीएसटी दर १८ टक्क्यांवरून ५ टक्के करावे. जीएसटी दर कमी झाल्यास पर्यटनाला नवी गती मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि ग्रामीण व शहरी भागातील पर्यटनस्थळांना मजबुती मिळेल. याशिवाय विदर्भात पर्यटनवाढीसाठी सरकारने मूलभूत सोयीसुविधा विकसित करण्याची गरज असल्याचेही चौकसे यांनी सांगितले. राज्य सरकारने केंद्र सरकारपुढे हा मुद्दा विशेषरित्या मांडावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना करण्यात आली असून, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा चौकसे यांनी केला. पत्रपरिषदेत संघटनेचे उपाध्यक्ष धर्माजी रमानी, सचिव डॉ. राजेंद्र पडोळे, कोषाध्यक्ष नरेंद्र वाघ, दिनेश भारती, अनिल वाधवानी आदी उपस्थित होते.