रेशनच्या धान्याचे वाहन, पोलिसांची एन्ट्री अन् व्हायरल व्हिडीओ, धान्याचा काळाबाजार करणारे वाहन पोलिसांनी घटनास्थळीच सोडून दिले
By नरेश डोंगरे | Updated: December 22, 2025 22:10 IST2025-12-22T22:07:24+5:302025-12-22T22:10:43+5:30
Nagpur News: काळाबाजारीचा संशय असलेले वाहन घेऊन कथित आरोपी समोर जातात तर कारवाईसाठी आलेले पोलिस माघारी फिरतात. मात्र, यानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र चर्चेला उधाण येते.

रेशनच्या धान्याचे वाहन, पोलिसांची एन्ट्री अन् व्हायरल व्हिडीओ, धान्याचा काळाबाजार करणारे वाहन पोलिसांनी घटनास्थळीच सोडून दिले
- नरेश डोंगरे
नागपूर - शहरातील कुख्यात रेशन माफियाचे वाहन एका दुकानातून धान्य घेऊन निघते. या धान्याची काळाबाजारी होत असल्याचा संशय असल्याने एक सजग नागरिक कंट्रोल रुमला फोनवरून माहिती देतो. त्यामुळे जरीपटक्याचे दोन पोलीस मध्येच येऊन हे वाहन थांबवितात. त्यानंतर तेथे रेशन माफिया पोहचतो. अर्थपूर्ण बोलणी होते अन् नंतर पांगापांग होते. काळाबाजारीचा संशय असलेले वाहन घेऊन कथित आरोपी समोर जातात तर कारवाईसाठी आलेले पोलिस माघारी फिरतात. मात्र, यानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र चर्चेला उधाण येते.
घटना जरीपटक्यातील आहे. १८ डिसेंबरच्या दुपारी ३ च्या सुमारास चांदवानी नामक व्यक्तीच्या ठिकाणाहून कुख्यात रेशन माफिया विकी कुंगानीची माणसं एमएच ४९/ एटी ९१२५ मध्ये स्वस्त धान्य दुकानाचे रेशन धान्य भरतात. हे वाहन पढे निघाल्यानंतर काळाबाजारीचा दाट संशय असल्याने एका सजग नागरिकाने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे कंट्रोल रूमच्या माध्यमातून जरीपटका ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. त्या पोलिसांनी ते वाहन रोखले. विचारपूस सुरू असतानाच तेथे कुख्यात रेशन माफिया विक्की पोहोचला. सलामदुवा केल्यानंतर त्याने पोलिसांनी चर्चा केली. तेथे काय बातचीत झाली कळायला मार्ग नाही. मात्र, त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हे वाहन सोडून दिले. या सर्व प्रकारावर नजर ठेवून असलेल्या सजग नागरिकांनी या प्रकरणाचा व्हिडिओ, फोटो मोबाईलमध्ये घेऊन ते व्हायरल केले. त्यानंतर रविवारपासून संबंधित वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. धान्याच्या काळाबाजारीला जरीपटका पोलिसांची साथ असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
कोणती चाैकशी केली ?
धान्याची काळाबाजारी करणाऱ्या त्या वाहनाची आणि व्यक्तीची संबंधित पोलिसांनी कोणती चाैकशी केली. त्यांनी वाहनातील धान्य तपासले का, त्यात त्यांना काय आढळले, त्यांनी संबंधित वाहन पोलिस ठाण्यात नेण्याची तसदी का घेतली नाही, धान्याच्या वाहनाला जागेवरूनच सोडून देण्याचा निर्णय त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून घेतला, अशी एक ना अनेक प्रश्न चर्चेला आली आहे. वरिष्ठांकडून या प्रकरणाची कशी दखल घेतली जाते आणि गोरगरिबांच्या ताटातील अन्न खुल्या बाजारात नेऊन काळाबाजारी करण्यास मदत करणारांवर कोणती कारवाई केली जाते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मॉलच्या मागेही पकडले होते वाहन
यापूर्वी जरीपटक्यातील जिंजर मॉलच्या मागे पोलिसांनी रेशनचा साठा पकडला होता. मात्र, त्यानंतर कोणती कारवाई झाली ते पुढे आले नाही. यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संघर्षनगर येथेही संबंधित विभागाच्या पथकाने कारवाई केली होती. या कारवाईत लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.