वडिलांच्या अपघातानंतर रतन बनला आधार : नागपूर रेल्वेस्थानकावर वाहतोय ओझे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 10:20 PM2019-05-04T22:20:06+5:302019-05-04T22:22:46+5:30

वडिलांना अपघात झाला. त्यांच्या पायात रॉड टाकल्यामुळे त्यांना रेल्वेस्थानकावर ओझे उचलणे अशक्य झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अखेर रतनने आपल्या इच्छाआकांक्षांचा बळी दिला अन् अंगावर कुलीचा लाल ड्रेस चढविला. रेल्वेस्थानकावर सध्या सर्वात कमी वयाचा कुली म्हणून रतन प्रवाशांचे ओझे वाहत आहे.

Ratan became a base after father's accident: Transportation at Nagpur railway station | वडिलांच्या अपघातानंतर रतन बनला आधार : नागपूर रेल्वेस्थानकावर वाहतोय ओझे

वडिलांच्या अपघातानंतर रतन बनला आधार : नागपूर रेल्वेस्थानकावर वाहतोय ओझे

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वात कमी वयाचा कुली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजकालची मुले दहावी झाली की कॉलेजात जाताना वडिलांपुढे बाईकचा हट्ट धरतात. खर्चासाठी त्यांना पॉकेट मनीही हवा असतो. घरच्यांकडून त्यांचे नको ते लाड पुरविले जातात. परंतु १९ वर्षाच्या रतनच्या वाट्याला हे सुख आले नाही. दहावीनंतर घरच्या परिस्थितीमुळे त्याने कपड्याच्या दुकानात काम केले. वडील कुली असल्यामुळे मिळेल त्या कमाईत ते कुटुंबाचा गाडा हाकत होते. परंतु त्यांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली. रतनच्या वडिलांना अपघात झाला. त्यांच्या पायात रॉड टाकल्यामुळे त्यांना रेल्वेस्थानकावर ओझे उचलणे अशक्य झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अखेर रतनने आपल्या इच्छाआकांक्षांचा बळी दिला अन् अंगावर कुलीचा लाल ड्रेस चढविला. रेल्वेस्थानकावर सध्या सर्वात कमी वयाचा कुली म्हणून रतन प्रवाशांचे ओझे वाहत आहे.
नारी येथील तक्षशिला नगरातील मनोहर मेश्राम (६१) नागपूर रेल्वे स्थानकावर कुली म्हणून कामाला होते. त्यांना पत्नी, अजय आणि रतन अशी दोन मुले आहेत. अजय पदवीधर तर रतन दहावी पास आहे. दिवसभर प्रवाशांचे ओझे वाहून मिळालेल्या पैशातून ते मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचे पालनपोषण करीत होते. परंतु नियतीला हे मान्य नव्हते. १७ जून २०१८ रोजी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाले असताना रेल्वेस्थानकाजवळ त्यांचा अपघात झाला. यात त्यांच्या पायात रॉड टाकल्यामुळे त्यांना अपंगत्व आले. प्रवाशांचे भारी ओझे उचलणे त्यांना शक्य झाले नाही. त्यानंतर खरा प्रश्न निर्माण झाला तो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा. मनोहर मेश्राम हे आपल्या दोन्ही मुलांना शिकवित होते. मोठा मुलगा अक्षय रेल्वेच्या परीक्षेची तयारी करीत होता. तर लहान मुलगा नुकताच दहावी झाला होता. आपल्या मुलाने कुली व्हावे असे कधीच त्यांना वाटले नसावे. परंतु परिस्थितीपुढे कुणाचे काही चालत नाही असे म्हणतात. त्यांची पत्नीही धुणीभांडी करून घरात चार पैशांची मदत करते. कुटुंबासाठी रतनने मनाचा दृढ निश्चय केला. आपल्या वडिलांचा २६७ क्रमांकाचा कुलीचा बिल्ला घेऊन कुटुंबासाठी आपल्या इच्छाआकांक्षाचा बळी देत कुलीचा लाल ड्रेस अंगावर चढविला. मागील दहा दिवसांपासून तो रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे ओझे त्यांच्या कोचपर्यंत पोहोचवून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत आहे. इच्छा नसतानाही रतनला परिस्थितीमुळे कुलीचे काम करावे लागत आहे. कुटुंबासाठी रतन हसत-खेळत आलेल्या परिस्थितीला सामोरे जात कुलीचे काम करीत आहे.
७५ वर्षांचे बाबुरावही वाहतात ओझे
शासकीय कर्मचारी ५८ वर्ष झाले की निवृत्त होतात. मिळालेल्या पेन्शनच्या पैशातून ते उर्वरीत आयुष्य सुखाने घालवितात. परंतु रेल्वेस्थानकावर कुलीचे काम करणाऱ्या आणि रामेश्वरी परिसरात राहणाऱ्या बाबुराव तायडे या ७६ वर्षाच्या कुलीच्या वाट्याला अजूनही ओझे उचलण्याचे काम आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर जवळपास १५२ कुली काम करतात. त्यातील बाबुराव एक आहेत. बाबुरावला पत्नी आणि दोन मुले आहेत. मुले कमावती झाली. परंतु ती व्यसनी असल्यामुळे त्यांचे पालनपोषणही अजून त्यांना करावे लागते. हातपाय चालतील तोपर्यंत कुटुंबासाठी कुलीचे काम करावेच लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Ratan became a base after father's accident: Transportation at Nagpur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.