सामाजिक समरसतेसाठी आदिवासींना जोडणार संघ; जबलपूरमध्ये होणार मंथन
By योगेश पांडे | Updated: September 25, 2025 23:41 IST2025-09-25T23:41:38+5:302025-09-25T23:41:38+5:30
विजयादशमी उत्सव झाल्यावर देश-विदेशात विस्तारावर भर

सामाजिक समरसतेसाठी आदिवासींना जोडणार संघ; जबलपूरमध्ये होणार मंथन
योगेश पांडे
नागपूर : विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. संघाकडून पुढील कालावधीत पंच परिवर्तनाच्या बिंदूंवर समाजात कार्य करण्याची योजना आहे. मात्र, समाजात सामाजिक समरसता प्रस्थापित व्हावी, यादृष्टीने मोहीम राबविण्याचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. विशेषत: अनुसूचित जाती, जमाती व आदिवासींना जोडण्याच्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे. यासंदर्भात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस जबलपूरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत सखोल मंथन होणार आहे.
संघाकडून कुटुंब प्रबोधन, स्वआधारित व्यवस्था, पर्यावरण संवर्धन, नागरी कर्तव्य यांच्यासोबत सामाजिक समरसता या पाच पंच परिवर्तनाच्या बिंदूंवर पुढील कालावधीत मोठ्या प्रमाणावर काम होणार आहे. या सर्व बिंदूंशी निगडित कार्यकर्ते व विशिष्ट आयाम संघाकडून तयार झाले आहेत व काही प्रमाणात कामदेखील सुरू झाले आहे. सामाजिक समरसता मंचाच्या माध्यमातून संघाचे स्वयंसेवक बऱ्याच काळापासून या दिशेने काम करत आहेत. मात्र, आता याला अधिक गती देण्यात येणार आहे. यात समाजातील अनुसूचित जाती, जमाती व आदिवासींना जोडण्यावर भर असेल. तसेच दुर्गम भागातदेखील एक गाव-एक पाणवठा-एक स्मशानभूमी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील सखोल नियोजनाचा आढावा ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान जबलपूरला होणाऱ्या अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल. तसेच देश-विदेशात या दृष्टीने काय धोरण आखायचे, या दृष्टीनेदेखील चर्चा होईल.
आदिवासी भागांतदेखील विजयादशमी उत्सव
संघाकडून सामाजिक समरसतेच्या मोहिमेची नवी सुरुवात म्हणून विजयादशमी उत्सवाचे आयोजन देशभरातील लहान लहान भागांतदेखील करण्यात येणार आहे. विशेषत: ईशान्येकडील राज्य, धगधगत्या मणिपूरसारख्या राज्यांतदेखील मोठ्या प्रमाणात आयोजन होणार आहे. समाजातील सर्वच स्तरांतील व पंथातील नागरिक व मान्यवरांना स्थानिक पातळीवर निमंत्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जबलपूरच्या बैठकीत विस्तारावर चर्चा
वर्षभरात संघाच्या दोन महत्त्वाच्या बैठका होतात. त्यात अखिल भारतीय प्रतिनिधी सभा व अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाची बैठक यांचा समावेश आहे. दरवेळी या बैठकी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित होतात. विजयादशमीनंतर लगेच होत असलेल्या या बैठकीत संघ विस्तारावरदेखील चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह सर्वच अखिल भारतीय अधिकारी व प्रचारक उपस्थित राहतील.