शिस्त-लयबद्धतेचा संगम, संघाचे नागपुरात ऐतिहासिक पथसंचलन; हजारो स्वयंसेवक सहभागी
By योगेश पांडे | Updated: September 28, 2025 00:21 IST2025-09-28T00:20:08+5:302025-09-28T00:21:33+5:30
प्रथमच तीन ठिकाणांहून निघाले संचलन, सरसंघचालकांनी केले अवलोकन, मुख्यमंत्रीदेखील उपस्थित

शिस्त-लयबद्धतेचा संगम, संघाचे नागपुरात ऐतिहासिक पथसंचलन; हजारो स्वयंसेवक सहभागी
योगेश पांडे
नागपूर : शताब्दी वर्षात प्रवेश करत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी शनिवारी सायंकाळी ऐतिहासिक पथसंचलन काढले. यात स्वयंसेवकांच्या शिस्त व लयबद्धतेचे नागपुरकरांना दर्शन झाले. विशेष म्हणजे संघ स्थापनेपासून प्रथमच विजयादशमीचे पथसंचलन एकाच वेळी तीन ठिकाणांहून निघाले. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील पथसंचलनाचे अवलोकन करण्यासाठी पोहोचले. याशिवाय विविध ठिकाणी हजारो स्वयंसेवकांवर पुष्पवर्षा करत पथसंचलनाचे स्वागत करण्यात आले.
इंग्रजी कॅलेंडरनुसार २७ सप्टेंबर रोजी संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर, पहिल्यांदाच दोन ऐवजी तीन ठिकाणांहून मोर्चा सुरू झाला. एरवी विजयादशमीच्या सकाळी मुख्य कार्यक्रमापूर्वी दोन गटात पथसंचलन व्हायचे. मात्र यावेळी शताब्दी वर्षानिमित्त तीन ठिकाणांहून पथसंचलन निघाले. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास कस्तुरचंद पार्क, यशवंत स्टेडियम व अमरावती मार्गावरील हॉकी मैदानावरून स्वयंसेवक निघाले. ७.३५ च्या सुमारास तीनही पथसंचलन सिताबर्डी येथील व्हेरायटी चौकात एकाच वेळी पोहोचले. यावेळी घोष पथकानेही त्यांच्या स्थानिक रचना सादर करून लोकांची मने जिंकली. भारतीय राग आणि तालांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यावेळी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, महानगर संघचालक राजेश लोया यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ त्याचे अवलोकन केले.
मुख्यमंत्री, महसूलमंत्रीदेखील उपस्थित
दरम्यान, सिताबर्डीतच मुख्यमंत्री फडणवीस तसेच महसूलमंत्री बावनकुळे हेदेखील उपस्थित होते. त्यांच्यासोबत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख, समितीच्या कार्यवाहिका सीता अन्नदानम हेदेखील उपस्थित होते.
नागरिकांकडून ठिकठिकाणी स्वागत
तीन ठिकाणांहून एकाच वेळी पथसंचलन निघाले व मार्गांवर नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले. अनेक ठिकाणी नागरिकांनी पुष्पवर्षादेखील केली. यावेळी भारतमाता की जय यासारखे नारे लावण्यात येत होते.
पावसातदेखील स्वयंसेवकांचा उत्साह
पथसंचलनाअगोदर नागपुरात मुसळधार पाऊस झाला. मात्र त्या परिस्थितीतही पावसात भिजत स्वयंसेवक त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचले व ओल्या कपड्यांतच पथसंचलनासाठी एकत्रित आले. स्वयंसेवकांचा उत्साह वाढविण्यासाठी धंतोली, सिताबर्डी, कस्तुरचंद पार्क याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक पोहोचले होते.
सिताबर्डीत जुन्या आठवणींना उजाळा
संघाची स्थापना झाल्यानंतर अनेक वर्ष स्वयंसेवकांचे पथसंचलन हे सिताबर्डीतूनदेखील जायचे. मात्र त्यानंतर पथसंचलनाचा मार्ग बदलला. संघाच्या स्थापनेला तारखेनुसार शंभर वर्ष पूर्ण झाले असताना सिताबर्डीतून पथसंचलन गेले व अनेक वृद्ध लोकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.