रश्मी बर्वे यांचे टेकाडी सर्कलच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: July 22, 2024 18:21 IST2024-07-22T18:18:32+5:302024-07-22T18:21:53+5:30
बुधवारी सुनावणी : निवडणूक आयोगाचा कार्यक्रम जाहीर

Rashmi Barve's challenge to Tekadi Circle election in High Court
राकेश घानोडे
नागपूर : चांभार अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे जिल्हा परिषदेचे सदस्यत्व रद्द झालेल्या काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांनी पारशिवनी तालुक्यातील टेकाडी (को.ख.) सर्कलच्या पोटनिवडणुकीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांनी सोमवारी ही याचिका ऐकण्यासाठी बुधवारची तारीख दिली.
बर्वे टेकाडी सर्कलचे प्रतिनिधित्व करीत होत्या. त्यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईमुळे ही जागा रिक्त झाली. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने १९ जुलै २०२४ रोजी या सर्कलच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, या सर्कलमध्ये येत्या ११ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. बर्वे यांनी जात वैधता प्रमाणपत्र आणि जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करण्याच्या आदेशांविरुद्ध उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका निर्णयाधीन आहे. या याचिकेवर ९ मे २०२४ रोजी न्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे व मुकुलिका जवळकर यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. हा निर्णय अद्याप घोषित करण्यात आला नाही. या परिस्थितीत टेकाडी सर्कलची पोटनिवडणूक घेतली जाऊ शकत नाही, असा दावा नवीन याचिकेत करण्यात आला आहे. बर्वे यांच्या वतीने ॲड. समीर सोनवणे यांनी कामकाज पाहिले.