नोकरीचे आमिष दाखवून बडतर्फ शिपायाकडून तरुणीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 13:01 IST2022-07-06T12:59:38+5:302022-07-06T13:01:56+5:30
नोकरीच्या बहाण्याने बोलावून केला अत्याचार

नोकरीचे आमिष दाखवून बडतर्फ शिपायाकडून तरुणीवर अत्याचार
नागपूर : नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका बडतर्फ पोलीस शिपायाने तरुणीवर अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. अंबाझरी पोलिसांनी आरोपी नीलेश योगेश्वर हेडाऊ (२४, एमएसईबी कॉलनी, भंडारा) याला अटक केली आहे.
२९ जून रोजी अंबाझरी येथे राहणारी २४ वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात बहिणीसह सीताबर्डी येथे आली होती. दोघी बहिणी मोर भवन बसस्थानकावर नोकरीबाबत चर्चा करत होत्या. त्याच्याजवळ नीलेश हेडाऊ उभा होता. त्याने त्यांना आपल्याकडे नोकरी असल्याची बतावणी केली व स्वत:ची ओळख हॉटेल मालक, अशी करून दिली. त्याने तरुणीकडून तिचा मोबाइल क्रमांकही घेतला. रविवार, ३ जुलै रोजी नीलेशने तरुणीला फोन करून ‘पारडीत हॉटेल सुरू आहे, त्याच्या मालकाला मुलाखत घ्यायची आहे’, असे सांगून एसटी स्टँडवर बोलावले.
तो तरुणीसह एसटी स्टँडवरून भंडारा येथे जाणाऱ्या बसमध्ये चढला. रात्री आठ वाजता दोघेही पारडी येथील एका ठिकाणी बसमधून उतरले. मुलाखत देण्याच्या बहाण्याने नीलेश तरुणीला एका निर्जन घरात घेऊन गेला. तेथे त्याने मुलीवर जबरदस्ती सुरू केली. मुलीने कशीबशी आपली सुटका केली आणि पळू लागली. या प्रयत्नात ती जखमीही झाली. मात्र, ती परत नीलेशच्या हाती लागला. नीलेशने तिला पुन्हा घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. रात्रभर ओलिस ठेवल्यानंतर नीलेशने तरुणीला एसटी स्टँडजवळ सोडून पळ काढला.
घरी आल्यानंतर मुलीने झालेला प्रकार घरच्यांना सांगितला. जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तरुणीने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी नीलेश हेडाऊ असल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करण्यात आली. नीलेशवर यापूर्वीही विनयभंग, पोक्सो, मारहाण, धमकावणे, असे गुन्हे दाखल आहेत. त्याची पत्नीही त्याच्यापासून वेगळी राहते. अंबाझरी पोलिसांनी नीलेशला तत्काळ अटक केली. त्याच्यावर अत्याचार आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.