नागपुरात  सावत्र पित्याने केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:14 IST2018-12-23T00:13:36+5:302018-12-23T00:14:25+5:30

आपल्या सावत्र मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला यशोधरानगर पोलिसांनी अखेर अटक केली.

Rape committed by stepfather in Nagpur | नागपुरात  सावत्र पित्याने केला अत्याचार

नागपुरात  सावत्र पित्याने केला अत्याचार

ठळक मुद्देशाळकरी मुलीचे अपहरण : एक आठवड्यानंतर सापडला आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या सावत्र मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला यशोधरानगर पोलिसांनी अखेर अटक केली. प्रणय ऊर्फ पिंटू टेंभूर्णे ऊर्फ साहिल खान (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित बालिका (वय १२) सहावीत शिकते. वडिलाचे छत्र हरविल्यामुळे तिच्या आईने आधार म्हणून आरोपी प्रणयसोबत दुसरा निकाह केला होता. तो दारुडा आणि ऐतखाऊ असल्याचे नंतर तिच्या लक्षात आले. दरम्यान, आरोपीची नजर बालिकेवर होती. त्याने गेल्या आठवड्यात आपल्या मित्राची मोटरसायकल आणून बालिकेला त्यावर बसविले आणि तिला घेऊन तो बेपत्ता झाला. रात्र झाली तरी आरोपी आणि मुलगी घरी न परतल्याने पीडित बालिकेच्या आईने आपल्या बहिणीच्या मदतीने शोधाशोध सुरू केली. यशोधरानगर ठाण्यात तक्रारही नोंदवली. पोलिसांनी बालिकेच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तिच्यासोबत आरोपीचीही शोधाशोध सुरू केली. आठ दिवस होऊनही आरोपी किंवा त्याने अपहरण केलेल्या बालिकेचा पत्ता लागत नसल्याने पोलीसही हादरले होते. पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रदीप रायन्नावार यांनी एक पथकच आरोपीच्या शोधासाठी कामी लावले. आरोपीची बहीण भिवापूरला राहते, हे कळताच पोलीस पथक तिकडे रवाना झाले. तेथून आरोपी बालिकेसह पवनी (खुर्द) कडे गेल्याचे कळताच पोलिसांनी तिकडे धाव घेतली. १८ डिसेंबरला पहाटे ४ च्या सुमारास बालिका पोलिसांच्या हाती लागली. तिची वैद्यकीय तपासणी केली असता बालिकेसोबत आरोपीने अत्याचार केल्याचे उघड झाले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आरोपीही पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला अपहरण, बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.
लोकमतमुळे तपासाला गती
पोलिसांकडून मुलीला शोधण्यास विलंब झाल्यामुळे पीडित बालिकेची आई तिच्या नातेवाईकांसह लोकमत कार्यालयात आली. लोकमत प्रतिनिधीने नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि मुस्लीम समाजातील सामाजिक कार्यकर्ते गुलाम अशरफी यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला होता. पीडित बालिका सुखरूप आढळल्याने तिच्या आई तसेच नातेवाईकांना आनंद झाला आहे. मात्र, आरोपीने तिच्यासोबत दुष्कृत्य केल्याने त्यांच्यात संतापही आहे.

Web Title: Rape committed by stepfather in Nagpur