नागपुरात प्रॉपर्टी डीलरकडून खंडणी उकळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:48 IST2021-01-22T00:47:39+5:302021-01-22T00:48:55+5:30
Ransom from a property dealer एमआयडीसीतील प्रमोद शंकर डोंगरे (वय ५०) नामक प्रॉपर्टी डीलरला जीवे मारण्याची धमकी देऊन पाचपावलीतील गुंड सुकुमार ऊर्फ बंडू बेलेकर याने ४५ हजारांची खंडणी उकळली.

नागपुरात प्रॉपर्टी डीलरकडून खंडणी उकळली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमआयडीसीतील प्रमोद शंकर डोंगरे (वय ५०) नामक प्रॉपर्टी डीलरला जीवे मारण्याची धमकी देऊन पाचपावलीतील गुंड सुकुमार ऊर्फ बंडू बेलेकर याने ४५ हजारांची खंडणी उकळली. त्याच्याकडून पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी तगादा लावला गेल्याने डोंगरे यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दादाजीनगरात राहणारे प्रमोद डोंगरे प्रॉपर्टी डीलिंग करतात. त्यांचा होरा नामक व्यक्तीशी व्यवहार झाला होता. आरोपी बेलेकरला त्याची कुणकूण लागताच त्याने डोंगरे यांना गाठले. होरा यांच्या पांडुरंग नगरातील जमिनीची विक्री करून दे अन्यथा ५ लाख रुपये दे, असे तो म्हणाला. ८ जानेवारीपासून बेलेकर डोंगरेच्या मागे लागला. वेळोवेळी संपर्क करून तो अश्लील शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकीही देऊ लागला. दरम्यान, आरोपी बेलेकरने डोंगरेकडून ४५ हजार रुपये उकळले. पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी त्याने पिच्छा पुरविल्यामुळे अखेर डोंगरे यांनी एमआयडीसी पोलिसांकडे बुधवारी तक्रार नोंदवली. पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी वसुलीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. बंडू बेलेकरची चाैकशी सुरू आहे.
अनेकांकडून खंडणी वसुली
आरोपी बंडू बेलेकर हा सराईत गुंड असून त्याने अशाच प्रकारे आणखी किती जणांकडून खंडणी वसुली केली, त्याचा शोध घेण्याची मागणीही पुढे आली आहे.