बहिणींनी पाठविलेल्या राख्यांना भावांपर्यंत पोहचण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 09:41 PM2019-08-12T21:41:53+5:302019-08-12T21:43:02+5:30

यंदाही अनेक भावांना बहिणीने पाठविलेले रक्षासूत्र रक्षाबंधनाला मिळणार नसल्याचे दिसते आहे. कारण रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये (आरएमएस) असलेल्या अपुऱ्या यंत्रणेमुळे राख्यांच्या पार्सलचे गठ्ठे पडून आहेत.

Rakhi sent by the sisters Waiting for the brothers to reach | बहिणींनी पाठविलेल्या राख्यांना भावांपर्यंत पोहचण्याची प्रतीक्षा

बहिणींनी पाठविलेल्या राख्यांना भावांपर्यंत पोहचण्याची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देरेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये पडले आहेत राख्यांचे पार्सल : अपुऱ्या यंत्रणेचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जग कितीही ऑनलाईन झाले, तरी भारतीय सणांचे महत्त्व आजही कायम आहे. बहीण भावाचे नाते जपणारा रक्षाबंधनाचा सण भावाला रक्षासूत्र बांधून पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. बहीण देशाच्या कुठल्याही भागात असो, ती रक्षाबंधनाला भावाला रक्षासूत्र पाठवून आपल्या नात्यातील ऋणानुबंध जपते. पण बहिणीने पाठविलेले रक्षासूत्र भावाला वेळेवर मिळत नाही. यंदाही अनेक भावांना बहिणीने पाठविलेले रक्षासूत्र रक्षाबंधनाला मिळणार नसल्याचे दिसते आहे. कारण रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये (आरएमएस) असलेल्या अपुऱ्या यंत्रणेमुळे राख्यांच्या पार्सलचे गठ्ठे पडून आहेत.
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी मिळावी म्हणून बहीण वाटेल तो आटापिटा करून, वेळेत राखी खरेदी करून पोस्टाने पाठविते. आजही डाक विभाग आणि राखी हे ऋणानुबंध अजूनही जुळून आहे. त्यामुळे रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये राखीच्या सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात राख्या देशभरातून येतात. सूत्रांच्या मते, या काळात किमान १५ ते २० हजार राखी दररोज येथे येतात. जिल्हा, तालुका, गाव यानुसार राख्यांचे सॉर्टिंग करण्यात येते. नागपूर रेल्वेस्थानकावरील रेल्वे मेल सर्व्हिसेसच्या कार्यालयातून संपूर्ण विदर्भासह बुलडाणा, जळगावपर्यंत राख्या पाठविल्या जातात. देशभरातून रेल्वेच्या पार्सलने आलेल्या राख्यांचे विभाजन करण्यासाठी रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये अपुरा कर्मचारीवर्ग असल्यामुळे, त्याचे विभाजन आणि संबंधित डाक कार्यालयाला वेळेत वितरित होऊ शकत नाही. अपुऱ्या
कर्मचाऱ्यांमुळे रेल्वेच्या पार्सल विभागात राख्यांच्या पार्सलचे गठ्ठे पडून आहेत. सूत्रांच्या मते, रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये सॉर्टिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. राखीसारख्या सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात देशभरातून पार्सल येत असल्यामुळे सॉर्टिंगच्या कामासाठी कर्मचारी वाढविण्याची गरज आहे. राख्यांचे गठ्ठे आरएमएसमध्ये पडून असल्याचे दिसले. परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी त्याचे फोटो काढण्यास मनाई केली.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रेल्वे मेल सर्व्हिसेसमध्ये पडून असलेल्या गठ्ठ्यावरून असे निदर्शनास येते की, यंदाही भावांना रक्षाबंधनाला रक्षासूत्राची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कुठलेही पार्सल पेन्डिंग नाही
यासंदर्भात आरएमएसमधील एका कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्यांचे म्हणणे होते की, राख्यांचे सॉर्टिंग नियमित होत आहे. रक्षाबंधनाच्या काळात डाक सॉर्टिंग करण्यासाठी आम्ही अतिरिक्त कर्मचारी लावतो. दररोज आलेल्या पार्सलची सॉर्टिंग होत आहे. संबंधित पोस्टाच्या कार्यालयाकडे ती पाठविली जात आहे. कुठलेही पार्सल आमच्याकडे पेन्डिंग नाही.

Web Title: Rakhi sent by the sisters Waiting for the brothers to reach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.